मालगुंड आरोग्य केंद्रातर्फे उद्या नेवरे येथे मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर

रत्नागिरी : मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर उद्या (२१ जुलै) सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय, नेवरे येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी संपूर्ण बॉडी चेकअप, रक्ताच्या तपासण्या, ईसीजी, वजन व उंची मोजणी तसेच असंसर्गजन्य आजारांची तपासणी व समुपदेशन या सुविधा तज्ञ वैद्यकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
परिसरातील सर्व नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन वेळेवर आरोग्य तपासणी करून घ्यावी, तसेच आपल्या कुटुंबीयांनाही या शिबिरात सहभागी करून घ्यावे, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंडच्या वतीने करण्यात आले आहे.


