मुख्य बातमी

रत्नागिरी पोलीस दलाच्या ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

रत्नागिरी : रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने मा. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये विविध सामाजिक व सुरक्षा विषयांबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाअंतर्गत आज मुकुल माधव विद्यालय आणि पटवर्धन हायस्कूल, रत्नागिरी येथे विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले.

मुकुल माधव विद्यालयात आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी सायबर सुरक्षितता (Cyber Awareness), अमली पदार्थविरोधी जनजागृती (Mission Phoenix), वाहतूक नियमांचे पालन (Traffic Awareness), गुड टच–बॅड टच, स्वसंरक्षण (Self Protection) तसेच भविष्यातील करिअरच्या संधी (Future Career Opportunities) या महत्त्वपूर्ण विषयांवर सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देत त्यांनी सुरक्षित, जबाबदार आणि जागरूक नागरिक बनण्यासाठी मार्गदर्शन केले.

दरम्यान, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महमुनी यांनी पटवर्धन हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना याच विषयांवर मार्गदर्शन केले. त्यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधत सायबर गुन्ह्यांपासून बचाव, अमली पदार्थांचे दुष्परिणाम, वाहतूक शिस्त, वैयक्तिक सुरक्षितता आणि करिअर नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.

‘मिशन रायझिंग फ्लॉवर्स’ या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे, अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश देणे, वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देणे, वैयक्तिक सुरक्षितता व स्वसंरक्षणाची जाणीव विकसित करणे तसेच करिअरविषयक योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविणे हा आहे.

विद्यार्थ्यांचे उज्ज्वल, सुरक्षित आणि सशक्त भविष्य घडविण्यासाठी रत्नागिरी पोलीस दलाकडून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून स्वागत करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!