मुख्य बातमी

निवडणुका दिसू लागल्यानेच जिल्हा बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न : अध्यक्ष तानाजीराव चोरगे

रत्‍नागिरी जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

रत्नागिरी : गेल्‍या वीस वर्षांच्या कालावधीत एकाही सभासदाने बँकेच्‍या कामकाजाविषयी तक्रार केली नाही; मात्र दुसर्‍याच व्‍यक्‍तीने तक्रार केली. खेडमध्‍ये राहतो त्‍याला बँकेचा ‘ठो’ कळत नाही, मात्र त्‍याला घोटाळा दिसला. आज राज्‍यात चांगल्‍या कामगिरीच्‍या जोरावर जिल्‍हा बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे. बँकेच्‍या कारभारात गलथानपणा असता, तर नाबार्ड किंवा आरबीआयने सोडले असते का, असा प्रश्‍न जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी उपस्‍थित केला. निवडणुका जवळ दिसू लागल्‍यामुळेच संचालक मंडळाला बदनाम करण्‍याचा मार्ग अवलंबण्‍यात येत असून, सभासदांनी योग्‍य व्‍यक्‍तीलाच भविष्‍यात बँकेवर पाठवावे, असा मोलाचा सल्‍लाही त्‍यांनी दिला.

रत्‍नागिरी जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेची ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा रत्‍नागिरीतील जयेश मंगल कार्यालयात डॉ. तानाजीराव चोरगे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली पार पडली. संचालक मंडळाची ही शेवटची सर्वसधारण सभा होती. यावेळी उपाध्‍यक्ष बाबाजीराव जाधव, ज्‍येष्‍ठ संचालक सुधीर कालेकर, जयंत जालगावकर, राज्‍य पतसंस्‍था फेडरेशनचे अध्‍यक्ष व संचालक ॲड. दीपक पटवर्धन, ज्‍येष्‍ठ संचालक रमेश दळवी, संचालक रमेश कीर, गजानन पाटील, राजेंद्र सुर्वे, अमजद बोरकर, रामभाऊ गराटे, नेहा माने, दिशा दाभोळकर यांच्‍यासह संचालक मंडळ उपस्‍थित हो”ते.

आपल्‍या अध्‍यक्षीय मनोगतात डॉ. चोरगे म्‍हणाले की, वीस वर्षांपूर्वी बँकेची कमान ताब्‍यात घेतानाच घरामध्‍ये लढाई झाली त्‍याचे दु:ख आहे. बँकेची स्‍थिती त्‍यावेळी वाईट होती, ही सुधारायची कशी अशी भीती मनात होती. दाखवायला १३ मात्र ६३ टक्क्यांपर्यंत एनपीए त्‍यावेळी होता. त्‍यानंतर वेळोवेळी घेण्‍यात आलेले कठोर निर्णय आणि त्‍यात संचालक, सर्व सभासद, कर्मचारी यांची मिळालेली मोलाची साथ याचमुळे आज बँक उर्जितावस्‍थेत येऊन राज्‍यात दुसऱ्या क्रमांकावर पोहचली आहे. संचालक मंडळात विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी आहेत. सहकारामध्‍ये राजकारण आणले की संस्‍था बुडीत निघाली म्‍हणून समजा असे स्‍पष्‍ट मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

आपल्‍या याच कामकाजामुळे वीस वर्षांत बँकेच्‍या एकाही सभासदाने तक्रार केली नाही; मात्र आता भलत्‍याच व्‍यक्‍तीने तक्रार केली आहे. खेडमधील एका व्‍यक्‍तीला बँकेत घोटाळा दिसत असल्‍याचा टोलाही त्‍यांनी नाव न घेता मारला. १ कोटी ३७ लाखांच्या कर्जात हजारो कोटींचा भ्रष्‍टाचार कसा काय असू शकतो, असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्‍थित केला. २००० साली निवळी येथे संस्‍था उभारणीसाठी २ कोटी ३७ लाखांचे कर्ज घेतले त्‍यावेळी मी बँकेवर संचालकही नव्‍हतो. त्‍यावेळी सात एकरहून अधिकची जागा तारण ठेवली होती; मात्र आता सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून बदनामी करून लोकांना बँकेबद्दल संभ्रम निर्माण करण्‍याचा प्रयत्‍न सुरू आहे.

जिल्‍ह्याबाहेर साखर कारखान्‍यांना बेकायदेशीर कर्ज दिल्‍याचा आरोप केला जातोय, बेकायदेशीर व्‍यवहार केले असते तर नाबार्ड-आरबीआय कारवाई करायचे ठेवेल का, असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्‍थित केला. त्‍यांनी आरोप केलेत तेवढे नाही तर १२७४ कोटी साखर कारखान्‍यांना कर्ज दिले असल्‍याचे डॉ. चोरगे यांनी थेट सांगितले. जिल्‍हा बँकेने एकट्यानेच नाही तर तीन-चार बँका एकत्र येऊन हा कर्ज पुरवठा करतात, त्‍यासाठी राज्‍य बँक किंवा अन्‍य अग्रणी बँक यात लीड घेत असते. आपल्‍या पेक्षाही सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई बँकांनी साखर कारखान्‍यांना अधिक कर्ज दिले असल्‍याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. साखर कारखान्‍यांमुळे १२९ कोटी ३० लाखांचे व्‍याज मिळाले आहे. मुळात जिल्‍ह्यात एवढा कर्ज वितरण होत नसल्‍याने, ठेवीदारांना व्‍याज देता यावे यासाठी सहकार खात्‍याच्‍या अधीन राहून आरबीआयच्‍या नियमानुसार हे कर्ज व्‍यवहार करावे लागत असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

गेल्‍या वीस वर्षांत आपण गैर काहीही केले नाही. संचालकांनी कर्ज घेतले आणि बुडवले असे एकही प्रकरण आपल्‍या कारकिर्दीत घडले नाही. बँकेत काही चुकीच्‍या गोष्‍टी घडल्‍या, त्‍याला जबाबदार असणार्‍या कर्मचार्‍यांवर योग्‍य ती कारवाईही बँकेने वेळोवेळी केली असल्‍याचे डॉ. चोरगे यांनी सांगितले. चांगल्‍या गोष्‍टी घडवण्‍यासाठी वाईटपणा घ्‍यावा लागतो असे सांगतानाच आता बँकेच्‍या सभासदांनीच बँकेचे मूल्यांकन करावे, असे आवाहन करताना तुमचा विश्‍वास हीच आमची ताकद असून भविष्‍यात येणार्‍या निवडणुकांमध्‍ये चांगली माणसे या बँकेत निवडून आणा, कोण उभा आहे, कसा आहे याचा विचार करा, सहकार आणि संस्‍था महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन बँकेला आणखी उंच शिखरावर न्‍या ,असे आवाहनही डॉ. तानाजीराव चोरगे यांनी शेवटी व्‍यक्‍त केले.

यावेळी अनेक सभासदांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त करीत पुढील तीन वर्षानंतर पुन्‍हा बँकेवर यावे आणि बँकेच्‍या वाटचालीसाठी सर्वांनी मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर गिम्‍हवणेकर यांनी उपस्‍थित सर्वांचे आभार मानले. सरव्‍यवस्‍थापक समीर दळवी यांनी निवेदन केले.

आमदार होण्‍यापूर्वी जिल्‍हा बँकेत संचालक असलेले किरण सामंत यांनी त्‍यानंतर संचालक मंडळाचा राजीनामा दिला होता. बँकेने राज्‍यात केलेल्‍या प्रगतीबद्दल संचालक मंडळाच्‍या शेवटच्‍या बैठकीत, संचालकांना भेटण्‍यासाठी आ. किरण सामंत यांनी उपस्‍थित राहत, सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी जिल्‍हा बँकेचे अध्‍यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी आ. किरण सामंत यांचा सत्‍कार केला. आमदार भास्‍कर जाधव यांनी बँकेला पत्र देत वार्षिक कार्यअहवाल वाचून आनंद झाला. बँकेने केलेली प्रगती लक्षणीय असून याबद्दल संचालक मंडळाचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!