रक्षाबंधनासाठी रत्नागिरी डाक विभागाची विशेष तयारी; १२ रुपयांत आकर्षक राखी पाकीट उपलब्ध
सीमेवरील सैनिकांनाही राखी पाठविण्याची विशेष सुविधा : राख्या वेळेत पोहोचण्यासाठी टपाल वर्गीकरणात प्राधान्य

रत्नागिरी : रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बहीण-भावाच्या स्नेहाचे बंध अधिक दृढ करण्यासाठी रत्नागिरी डाक विभागाने यंदाही विशेष तयारी केली आहे. देश-विदेशातील आपल्या प्रियजनांपर्यंत राख्या सुरक्षित आणि वेळेत पोहोचाव्यात यासाठी जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये १२ रुपये किमतीच्या विशेष रंगीत राखी पाकिटांची विक्री सुरू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी दिली.
गेल्या वर्षी रत्नागिरी डाक विभागाच्या माध्यमातून राखी वितरणाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. १८,७५२ विशेष राखी पाकिटांची विक्री करण्यात आली होती, तर २८,७५९ राख्या साध्या टपालाद्वारे वितरित करण्यात आल्या. ७,६५४ राख्या स्पीड पोस्ट व रजिस्टर पोस्टद्वारे देशभरात पोहोचविण्यात आल्या. याशिवाय अनेक राख्या परदेशातही यशस्वीपणे पाठविण्यात आल्या होत्या.
नागरिकांना देशातील तसेच परदेशातील कोणत्याही ठिकाणी राख्या पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राख्या लवकर पोहोचण्यासाठी स्पीड पोस्टची व्यवस्था करण्यात आली आहे. राख्या वेळेत पोहोचाव्यात यासाठी टपालाच्या वर्गीकरणामध्ये (Sorting) राखी टपालाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. सीमेवर देशसेवा बजावणाऱ्या जवानांना राख्या पाठविण्यासाठीही पोस्ट ऑफिसमार्फत विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील माता-भगिनींनी या सुविधेचा लाभ घ्यावा. अंतरामुळे भावाची प्रत्यक्ष भेट शक्य नसली तरी, डाक विभागाच्या विश्वासार्ह सेवेच्या माध्यमातून आपल्या भावापर्यंत प्रेम, आपुलकी आणि रक्षाबंधनाच्या शुभेच्छा वेळेत पोहोचवाव्यात. तसेच, डाक विभागाच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी केले आहे.



