जगबुडी नदीतील कंटेनर चालकाचा मृतदेह २२ तासांनंतर बाहेर

खेड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी नदी पुलावरून नदीपात्रात कोसळलेल्या कंटेनरमधील चालकाचा मृतदेह तब्बल २२ तासांच्या अथक शोधमोहीमेनंतर गुरुवारी बाहेर काढण्यात आला. अतिवृष्टीमुळे जगबुडी नदीच्या पाणीपातळीत झालेल्या वाढीमुळे बचावकार्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या.
बुधवारी सायंकाळी सुमारे ६.३० वाजता मॅगीची वाहतूक करणारा कंटेनर पुलावरून थेट नदीपात्रात कोसळला होता. त्यानंतर चालकाचा शोध घेण्यासाठी विसर्जन कट्टा मदत ग्रुप, रेस्क्यू टीम, खेड अग्निशामक दल, एनडीआरएफ तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी संयुक्तपणे सलग शोधमोहीम राबविली. अखेर २२ तासांच्या प्रयत्नांनंतर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.
या पार्श्वभूमीवर भाजप नेते तथा खेड नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात सहभागी झालेल्या विसर्जन कट्टा मदत ग्रुप, रेस्क्यू टीम, खेड अग्निशामक दल, एनडीआरएफ तसेच सर्व स्थानिक स्वयंसेवकांचे आभार मानले. प्रतिकूल परिस्थितीत जीवाची पर्वा न करता केलेल्या त्यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर जगबुडी पुलावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अपघात टाळण्यासाठी कायमस्वरूपी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.


