लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांची टिळक जन्मस्थानाला सदिच्छा भेट

रत्नागिरी : भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे अग्रदूत आणि असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीचे औचित्य साधून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी टिळक जन्मस्थान व ग्रंथालयाला सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेला व स्मृतींना विनम्र अभिवादन केले. ग्रंथालय निरीक्षण भेट प्रसंगी अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी टिळकांच्या ऐतिहासिक जन्मस्थानाची पाहणी केली आणि त्यांच्या जीवनाशी निगडित प्रेरणादायी आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर त्यांनी परिसरातील ग्रंथालयाला भेट देऊन तिथल्या दुर्मिळ ग्रंथसंपदेची आणि ऐतिहासिक दस्तऐवजांची माहिती घेतली. समाज घडवणुकीत आणि राष्ट्रीय जागृतीत ग्रंथालयांचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले, “लोकमान्य टिळकांचे विचार आणि त्यांनी दिलेला ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ हा नारा आजही आपल्याला प्रत्येक क्षेत्रात कर्तव्य निष्ठेने काम करण्याची प्रेरणा देतो. वैद्यकीय क्षेत्रातील तरुण पिढीने आणि विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील राष्ट्रप्रेम, चिकाटी आणि समाजसेवेचा वारसा आत्मसात करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” या भेटीदरम्यान लोकमान्य टिळक जन्मस्थान स्मारकाचे प्रतिनिधी, ग्रंथालय प्रतिनिधी उपस्थित होते.



