पुराच्या पाण्यात जीव धोक्यात घालून नागरिकाचे प्राण वाचविणाऱ्या गुरव बंधूंचा पोलीस अधीक्षकांकडून गौरव

राजापूर : अतिमुसळधार पावसात पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकाचे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्राण वाचविणाऱ्या राजापूर येथील वैभव गुरव आणि जगदीश गुरव यांच्या शौर्यपूर्ण कार्याची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या हस्ते त्यांचा प्रशस्तीपत्रक देऊन गौरव करण्यात आला.
काही दिवसांपूर्वी राजापूर शहरालगतच्या उन्हाळे येथील स्वामी समर्थ मठाजवळील मोरीवर अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रचंड प्रवाह सुरू होता. मोरी पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. त्याचवेळी फुफेरे येथील जाधव हे दुचाकीवरून राजापूरच्या दिशेने येत असताना त्यांनी पाण्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याचा वेग प्रचंड असल्याने दुचाकीवरील ताबा सुटून ते पुराच्या पाण्यात अडकले. वाहून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने त्यांनी जवळील झाडाचा आधार घेत मदतीसाठी आर्त हाका मारण्यास सुरुवात केली.
याचवेळी वैभव गुरव हे आपले बंधू जगदीश गुरव यांना रेल्वे स्थानकावर सोडण्यासाठी जात असताना त्यांना मोरीजवळ पाण्यात अडकलेली दुचाकी दिसली. संशय आल्याने त्यांनी तात्काळ वाहन थांबवून परिसराची पाहणी केली. शोध घेत असताना झाडाला धरून जीव वाचविण्यासाठी धडपडणारे जाधव त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत दोन्ही बंधूंनी क्षणाचाही विलंब न करता बचावकार्य सुरू केले.
कोणतेही बचाव साहित्य उपलब्ध नसतानाही त्यांनी प्रसंगावधान राखत झाडाच्या वेलीचा दोर तयार केला. मोठ्या धाडसाने तो जाधव यांच्यापर्यंत पोहोचवून स्वतःचाही जीव धोक्यात घालत त्यांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या धाडसी आणि समयसूचक कृतीमुळे एका व्यक्तीचा अमूल्य जीव वाचला.
या शौर्यपूर्ण आणि मानवतावादी कार्याची दखल घेत रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने दोन्ही बंधूंचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान केला. संकटसमयी दाखविलेले धैर्य, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेचा आदर्श यामुळे वैभव व जगदीश गुरव यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्याने राजापूरच्या नावाला मानाचा तुरा मिळाला आहे.



