मुख्य बातमी

महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांचे मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील काम कौतुकास्पद : अधिष्ठाता: डॉ. अनिल पावसे 

मत्स्य महाविद्यालयाचा ४५ वा वर्धापन दिन ४ ऑगस्ट रोजी दिमाखात साजरा

रत्नागिरी : मत्स्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे व्यवसाय क्षेत्रातील मोठे योगदान आहे, गेल्या ४४ वर्षांमध्ये महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी विविध मत्स्य संवर्धन, संशोधन, शासकीय क्षेत्रात कार्यरत असून मत्स्यसंवर्धना बरोबरच खाद्य, औषधे, विक्री, मत्स्यशेती यंत्र सामुग्री इ.; कंपन्यांमध्ये व्यवस्थापन क्षेत्रात मत्स्य पदवीधारकांना मोठी मागणी आहे. याच संधीचा वापर करून मत्स्य महाविद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मोठा ठसा उमटवलेला आहे; या बद्दल मत्स्य महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल पावसे यांनी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.

मत्स्य महाविद्यालयाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते पटांगणात ध्वजारोहण करून तसेच परिषद दालनात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. पावसे यांनी विद्यार्थ्याना महाविद्यालयाच्या उपलब्ध कोळंबी शेती प्रकल्प, प्रक्षेत्रे, प्रयोगशाळा आणि आद्ययावत पायाभूत सुविधांचा वापर करून ज्ञानानुभव मिळवावा असे विषद केले.

प्रारंभी प्रास्ताविकात डॉ. दबीर पठाण यांनी रत्नागिरीतील मत्स्य महाविद्यालय हे भारतातील अग्रगण्य महाविद्यालय असल्याचे नमूद करून यातील विद्यार्थी कठोर मेहनत घेऊन केंद्र सरकार, राज्य सरकार, खासगी क्षेत्र इ. ठिकाणी उच्च पदांवर सक्रिय कार्यरत असल्याचे विषद केले. वर्धापन दिनाचे औचित्य साधून यशस्वी माजी विद्यार्थ्यांची ‘थेट-भेट’ आजी विद्यार्थ्यांबरोबर केल्याबद्दल त्यांनी नी समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी मत्स्य महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. विजय निंबाळकर, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी, मत्स्य जलशास्त्र व मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. आसिफ पागारकर, मत्स्य प्रक्रिया तंत्रज्ञान व मत्स्य विस्तार शिक्षण विभागप्रमुख डॉ. दबीर पठाण, प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाट्ये, चे प्रभारी शास्त्रज्ञ डॉ. किरण मालशे, कृषी संशोधन केंद्र, शिरगांवचे प्रमुख डॉ. सोनोने आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त व्यासपीठावरील यशस्वी माजी विद्यार्थ्यांचे सत्कार माजी अधिष्ठाता, डॉ. राघवेंद्र पै यांचे हस्ते करण्यात आला. उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर दुपारच्या सत्रात सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रमुख पाहुणे आयसीएआर सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटचे (मुंबई) प्रभारी वैज्ञानिक डॉ. अजय नाखवा, एमटीए नेटवर्क (चीन)चे संचालक धनराज सिंग ठाकूर, मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी (मिरकरवाडा, रत्नागिरी) अक्षया मयेकर यांच्याशी संवाद साधून “मत्स्य शास्त्रातील नोकरी, व्यवसाय व उद्योग संधी” याविषयावर ‘थेट संवाद’ साधून भविष्यातील संधी कोणत्या?… आणि त्याची तयारी कशी करावी? याबाबत विस्तृत माहिती व सखोल मार्गदर्शन घेतले.

या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त डॉ.बा.सा.कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी मत्स्य महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठाचे सर्व संचालक, कुलसचिव यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. या दिनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. तसेच डॉ. अनिरुद्ध अडसूळ यांचे मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. त्यानंतर विविध स्पर्धांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तसेच आभार प्रदर्शन डॉ. सुहास वासावे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी, मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, येथील सर्व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मत्स्य महाविद्यातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी वर्ग, विद्यार्थी, यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!