सेवाशक्ती संघर्ष संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची विभाग नियंत्रक अश्वदीप जानराव यांच्यासोबत बैठक संपन्न

रत्नागिरी : सेवाशक्ती संघर्ष संघटना रत्नागिरी विभाग यांची येथील विभाग नियंत्रक अश्वदीप जानराव यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीला संघटनेचे अध्यक्ष संतोष बोरकर, उपाध्यक्ष संजीव बने, सचिव वसंत कांबळे, निलेश आखाडे आदी आगार पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत चालक-वाहक कर्मचाऱ्यांच्या ड्युटी अलोकेशन या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली. राजापूर, लांजा, गुहागर, खेड, मंडणगड आगारामध्ये वेळेवर ड्युटी अलोकेशन लावले जात नाही. रात्री ८ नंतर व्हाट्सअपवर टाकले जाते. बरेच कर्मचारी ग्रामीण भागात राहत असल्याने मोबाईल रेंज नसते. त्यामुळे आपली उद्याची ड्युटी काय आहे, या संभ्रमात असतात. त्यामुळे ड्युटीबाबत बरेच वाद निर्माण होतात, ही बाब यावेळी निदर्शनास आणून देण्यात आली.
विभाग नियंत्रक यांनी हे अलोकेशन दुपारी १२ वाजता लावण्यात येईल, याचे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे ओव्हर टाईमबाबत चर्चा झाली. यामध्ये जादा बेसिक असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ड्युटीला वापरले जातात. त्यामुळे महामंडळाचे नुकसान मोठ्या प्रमाणात केले जाते हे संघटना पदाधिकाऱ्याने पटवून दिले. त्याचप्रमाणे कामगार तक्रारीबाबत प्रामुख्याने राजापूर आगाराचे चालक तेजस रायबागकर यांच्यावर झालेली कारवाई दप्तरी जमा होऊन देखील पाच दिवसाचे वेतन दिले नाही. व श्रीमती अपूर्वा कदम, संदेश पवार, मनोज बारस्कर या कर्मचाऱ्यांच्या तक्रारीबाबत चर्चा करण्यात आली.
विभाग नियंत्रक श्री. जानराव यांनी सर्व तक्रारी समजून घेऊन तक्रारींची चौकशी करून न्याय दिला जाईल, असे आश्वासन दिले. काही यांत्रिक कर्मचाऱ्यांना चुकीच्या पद्धतीने बढती देण्यात आल्या आहेत व जबाबदार यांत्रिक कर्मचाऱ्यांकडे वाहन चालवण्याचा परवाना आहे; परंतु वाहन चालवता येत नाही अशा यांत्रिक कर्मचाऱ्यांची चौकशी व्हावी, अशी मागणी केली गेली. यंत्र अभियंतामार्फत चौकशी केली जाईल, असा खुलासा करण्यात आला.
या बैठकीमध्ये चर्चा झालेली विविध प्रश्न तातडीने सोडवले जातील, असे आश्वासन उपस्थित पदाधिकारी यांना देण्यात आले व मागील दोन महिन्यापासून दिलेल्या निवेदनावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने सेवाशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले. विभाग नियंत्रक श्री. जानराव यांचे आभार मानले.

