जिल्हा परिषद कुडली शाळेला जय हनुमान तरुण विकास मंडळातर्फे शाळेची बेल भेट

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा कुडली नं. ३ शाळेला माजी विद्यार्थी जय हनुमान तरुण विकास मंडळ मधलीवाडी कुडली माटलवाडी यांच्याकडून शाळेची घंटा भेट देण्यात आली.
शाळेचा भौतिक व शैक्षणिक विकास व्हावा यासाठी जय हनुमान विकासतरुण मंडळ यांच्याकडून शाळेला नेहमी सहकार्य केले जाते. शैक्षणिक साहित्य वाटप तसेच शाळेसाठी आवश्यक असणाऱ्या विविध गरजा पूर्ततेसाठी मंडळाचे पदाधिकारी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतात. पदाधिकाऱ्यांनी गेल्या वर्षी शाळेला भेट दिल्यानंतर शाळेसाठी आवश्यक असणारी घंटा शाळेला पुढील वर्षी निश्चित उपलब्ध करून देऊ हा शब्द दिला आणि यावर्षी या मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी शाळेमध्ये ही वस्तू भेट म्हणून दिली.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष संदीप थोरसे, उपाध्यक्ष राजेंद्र थोरसे, माजी अध्यक्ष विजय माटल, खजिनदार संदीप मोरे, बाळकृष्ण माटल, विवेक थोरसे, विश्वास थोरसे तसेच विविध पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश खारतोडे यांनी केले, तर शाळेचे मुख्याध्यापक संदेश सावंत यांनी शाळेला मंडळाचे विशेष कौतुक करून आभार मानले.



