नवनिर्माण देशभक्तीपर गीत व नृत्य स्पर्धांवर ‘फाटक’, ‘नवनिर्माण’चे वर्चस्व

रत्नागिरी : येथील नवनिर्माण हाय शाळा आयोजित १२ व्या आंतरशालेय देशभक्तीपर गीत गायन आणि नृत्य स्पर्धा अभूतपूर्व उत्साही प्रतिसादात संपन्न झाल्या. ११ शाळांच्या संघांनी सहभाग असणाऱ्या स्पर्धेत फाटक हायस्कूल आणि नवनिर्माण हाय यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले. कोस्टगार्डच्या कमाडंट नेहा भोला यांचे हस्ते विजयी संघाने पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना देशप्रेम, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे महत्त्व विशद केले.
नवनिर्माण हाय (CBSE) शाळा सलग १२ वर्षे देशभक्तीपर गीतगायन स्पर्धा घेत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश पारतंत्र्य आणि जूलूमशाही विरोधात बाल आणि युवा मनात देशप्रेमाची धगधगती ज्वाला प्रज्वलित व्हावी, मुलांना तो विचार आणि संस्कार मिळावे यासाठी देशाचे पहिले नोबेल पारितोषिक विजेते थोर विचारवंत, कवी रवींद्रनाथ टागोर यांनी १८६९ मध्ये प्रथम (बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेले) वंदेमातरंम गीत गायले. आज नव्या झेन अल्फा पिढीपर्यंत हा देश प्रेमाचा , अभिव्यक्ती आणि निर्भयतेचा संदेश जाणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी स्पर्धा उद्घाटनपर भाषणात व्यक्त केले. यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. दिलीप सरदेसाई उपस्थित होते.
देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचा निकाल असा : प्राथमिक गट (इयत्ता १ ली ते ५ वी) प्रथम क्रमांक – नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय – माने इंटरनॅशनल स्कूल, तृतीय – ऑनेस्ट गुरुकुल. उत्तेजनार्थ – ल. ग. पटवर्धन शाळा.
माध्यमिक गट (इयत्ता ६ वी ते ९ वी) प्रथम – फाटक हायस्कूल, द्वितीय – पोदार इंटरनॅशनल स्कूल. तृतीय – डी.जे. सामंत हायस्कूल पाली. उत्तेजनार्थ – माने इंटरनॅशनल स्कूल रत्नागिरी.
देशभक्तीपर नृत्य स्पर्धा – माध्यमिक गट (इयत्ता ६ वी ते ९ वी) प्रथम – नवनिर्माण हाय इंग्लिश मीडियम स्कूल, द्वितीय – मराठा मंदिर ग्लोबल स्कूल, तृतीय – जगद्गुरू नरेंद्र महाराज हायस्कूल, नाणीज. उत्तेजनार्थ – डी. जे. सामंत स्कूल रत्नागिरी.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून जेष्ठ संगीत तज्ञ राम तांबे, अंजली लिमये व नृत्य विशारद शिल्पा मुंगळे यांनी जबाबदारी सांभाळली.
कार्यक्रमाचे आयोजन नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सीमा हेगशेट्ये आणि नवनिर्माण हायच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा झारापकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.



