‘अभाविप’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात

रत्नागिरी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारोह रा. भा. शिर्के प्रशाला येथील रंजन मंदिर सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंट आनंद पंडित यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक व सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अभाविप जिल्हा प्रमुख प्रा. अमोल सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक यशावर न थांबता समाज आणि राष्ट्राच्या उभारणीत आपले योगदान देण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या मंचावर अभाविपचे विभाग संयोजक सुमित पाध्ये उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शहर सहमंत्री यश काळे यांनी केले.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करणाऱ्या या सोहळ्याला विद्यार्थी, पालक व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचा समारोप ‘संपूर्ण वंदे मातरम्’ने करण्यात आला.


