मुख्य बातमी

धामणसेंतील महिलांनी जोडला जवानांच्या मनगटाशी मायेचा धागा!

२६ बचत गट आणि धामणसें प्राथमिक शाळा व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींचा सहभाग : २६० राख्या सीमेवरील जवानांसाठी रवाना

रत्नागिरी : रक्षाबंधन म्हणजे केवळ भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा सण नव्हे, तर आपल्या देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचीही एक भावनिक संधी आहे, याची जाणीव करून देणारा अनोखा उपक्रम तालुक्यातील धामणसें ग्रामपंचायतीच्या वतीने ‘एक राखी जवानांसाठी’ या उपक्रमातून साकारला.

देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर राहून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या भारतीय जवानांच्या मनगटावर धामणसेंतील महिलांच्या हातांनी तयार केलेली राखी बांधली जावी आणि त्यातून ‘तुम्ही देशाचे रक्षण करता, आम्ही तुमच्यासोबत आहोत’ हा आपुलकीचा संदेश जवानांपर्यंत पोहोचावा, या भावनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत धामणसें गावातील संस्कृती ग्रामसंघाअंतर्गत २६ महिला बचत गट तसेच धामणसें माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. महिलांनी आणि विद्यार्थिनींनी जवानांसाठी तब्बल २६० राख्या तयार करून पाठविल्या. विशेष म्हणजे राख्यांसोबत विद्यार्थिनींनी जवानांसाठी प्रेम, आदर आणि शुभेच्छा व्यक्त करणारी शुभेच्छापत्रेही तयार केली.

राखी संकलनाच्या वेळी धामणसेंतील २६ बचत गटांचे अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशाच्या सीमेवर प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना उपस्थितांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’, ‘जय जवान, जय किसान’ अशा देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.

या घोषणांमुळे कार्यक्रमस्थळी उत्साह, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले. महिलांसोबत विद्यार्थिनींनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष भावनिक आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झाले.

या उपक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थिनींना जाणीवपूर्वक सहभागी करून घेण्यात आले. देशभक्ती केवळ राष्ट्रीय सणांपुरती मर्यादित न राहता लहान वयापासूनच विद्यार्थिनींच्या मनात देश, राष्ट्रध्वज आणि भारतीय जवानांविषयी आदर व कृतज्ञतेची भावना निर्माण व्हावी, हा या सहभागामागील प्रमुख उद्देश होता.

सीमेवर तैनात असलेला जवान हा कोणाचातरी भाऊ, मुलगा, पती किंवा वडील आहे. तो आपल्या कुटुंबापासून दूर राहून संपूर्ण देशाचे रक्षण करतो. त्यामुळे त्याच्या मनगटावर धामणसेंतील एका मुलीने किंवा महिलेने बांधलेली राखी ही केवळ धाग्याची नसून आपुलकी, कृतज्ञता आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोडणारी राखी ठरणार आहे.

यावेळी धामणसें ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी यांनी या उपक्रमामागील भावना स्पष्ट केली. “देशाच्या सीमेवर आपल्या कुटुंबापासून दूर राहून राष्ट्राच्या सुरक्षेसाठी अहोरात्र कर्तव्य बजावणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. महिला बचत गट आणि विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत २६० राख्या जवानांसाठी पाठविल्या, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. या उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये देशभक्तीची भावना रुजवण्यासोबतच जवानांप्रती आदर आणि आपुलकी व्यक्त करण्याची संधी मिळाली,” असे त्यांनी सांगितले.

धामणसें ग्रामपंचायतीच्या या उपक्रमातून रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीच्या नात्यापुरता मर्यादित न राहता देशाच्या सीमेवर उभ्या असलेल्या जवानांशी भावनिक नाते जोडणारा सण ठरला. धामणसेंतील गृहलक्ष्मी महीला स्वयंसहाय्यता समूह यांनी तयार केलेल्या राख्या जवानांपर्यंत पोहोचवून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या राख्या पोस्ट खात्याच्या सुविधेचा लाभ घेत जवानांपर्यंत पाठविण्यात आल्या. धामणसें पोस्टमास्तर श्री. प्रसाद कुळकर्णी आणि पोस्टमन विराज मेहेत्रे यांच्याकडे या राख्या सुपूर्त करण्यात आली. त्यामुळे धामणसें या गावातून निघालेला मायेचा हा धागा देशाच्या सीमेपर्यंत पोहोचणार आहे.

या उपक्रमातून महिला बचत गटांची संघटित शक्ती, धामणसें ग्रामपंचायतीचा सामाजिक दृष्टिकोन आणि विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला. गावातील महिलांनी केवळ राख्या तयार केल्या नाहीत, तर देशासाठी सेवा बजावणाऱ्या जवानांप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. विद्यार्थिनींनी या भावनेला शुभेच्छापत्रांची जोड देत या उपक्रमाला भावनिक स्पर्श दिला.

गावपातळीवर राबविलेला हा उपक्रम समाजातील विविध घटकांना एकत्र आणून ‘देशासाठी आपणही काही करू शकतो’ हा सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.

यावेळी धामणसें ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. ऋतुजा उमेश कुळकर्णी, ग्रामपंचायत सदस्या वैष्णवी धनावडे, सिद्धी कानडे, रेश्मा डापले, अनघा जाधव, बचत गटाच्या अनघा तोडणकर, गावातील सौ. श्रुती देसाई, श्रीमती रहाटे, धामणसें केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संपदा ढापरे, केंद्र प्रमुख श्री. वाफेलकर सर, शिक्षक तायडे सर, अंगणवाडी सेविका सौ. करुणा कुळकर्णी , सौ. स्मिता कुळकर्णी, बचत गट सीआरपी सौ. स्नेहा पांचाळ, ग्रामसंघ लिपिका सुजाता रहाटे, धामणसें माध्यमिक विद्यालयातील शिक्षिका प्रिया धुमाळी, ग्रामपंचायत कर्मचारी तनया वारसे व शुभांगी सांबरे यांच्यासह महिला बचत गटांच्या पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!