रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानात १३ ऑगस्टपासून रुद्रानुष्ठान संततधार

रत्नागिरी : रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवस्थानच्या श्री त्रुणबिंदूकेश्वरावर प्रतिवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या रुद्रानुष्ठान संततधार कार्यक्रमाचा शुभारंभ श्रावण प्रतिपदा, अर्थात १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमाची सांगता भाद्रपद प्रतिपदेला (शनिवार, १२ सप्टेंबर) रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. महिनाभर चालणाऱ्या या धार्मिक अनुष्ठानाच्या निमित्ताने मंदिरात विविध धार्मिक विधी आणि आरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या कालावधीत प्रत्येक सोमवारी सायंकाळी ६ वाजता, तर मंगळवार ते रविवार रात्री ९ वाजता मंदिरात आरती होणार आहे.
श्री देव भैरी हे रत्नागिरीचे ग्रामदैवत असल्याने श्रावण महिन्यात देवस्थानात भाविकांची विशेष गर्दी होत असते. श्री त्रुणबिंदूकेश्वरावरील रुद्रानुष्ठान संततधार हा धार्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. त्यामुळे या काळात देवस्थान परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमात सर्व भाविकांनी सहभागी होऊन श्री त्रुणबिंदूकेश्वराचे दर्शन व आरतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र तथा मुन्नाशेठ सुर्वे यांनी केले आहे.



