शिरगाव (रत्नागिरी) येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत स्वातंत्र्यदिन उत्साहात

रत्नागिरी : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरी येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संस्थान श्रीदेव गणपतीपुळे ट्रस्टचे अध्यक्ष नीलेश श्रीकृष्ण कोल्हटकर उपस्थित होते.
भारत माता प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. महर्षी कर्वे महिला महाविद्यालय, रत्नागिरीची एक विशेष परंपरा म्हणून शैक्षणिक वर्षात सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थिनीला १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाचा मान दिला जातो. यावर्षी BCA तृतीय वर्षात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये ८२.७० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्या श्रावणी आंबुलकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तिच्या या शैक्षणिक यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले.
यावेळी महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या स्थानीय व्यवस्थापन समिती सदस्या. सौ. शिल्पा पानवलकर, सौ. स्वरूपा सरदेसाई, माजी प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, महर्षी कर्वे महिला महाविद्यालच्या प्रभारी प्राचार्या प्रा. स्नेहा कोतवडेकर, कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या प्रा. समीना मुलाणी आणि उपस्थित होते. तसेच रत्नागिरी प्रकल्पातील सर्व विभागातील महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रमुख पाहुणे श्री. कोल्हटकर यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यदिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा व प्रेरणेचा दिवस असल्याचे सांगितले. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचे स्मरण करून विद्यार्थिनींनी ज्ञान, कौशल्य आणि संस्कारांच्या माध्यमातून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या शैक्षणिक, सामाजिक व विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीचे कौतुक करण्यात आले. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात. स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या वीविध स्पर्धेचे बक्षीस वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले..
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी उपस्थित मान्यवर, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनींचे आभार मानण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. श्रेया चांदोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. समिना मुलाणी यांनी केले.



