मुख्य बातमी

गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात रानभाजी पाककृती स्पर्धेला प्रतिसाद

रानभाजीचे थालीपीठ, सुरणाचे कटलेट, कबाब, अंबाडीचे कटलेट, टोरा टोफू पराठा वैशिष्ट्यपूर्ण

रत्नागिरी : गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) येथील वनस्पतीशास्त्र विभाग आणि अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या जीवशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी पाककृती स्पर्धा घेण्यात आली. वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत झालेल्या स्पर्धेत ३३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

रानभाज्यांचे पोषणमूल्य, औषधी गुणधर्म तसेच पर्यावरणीय महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे आणि स्थानिक हंगामी रानभाज्यांचा आहारातील वापर वाढावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश होता. विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचा कल्पकतेने वापर करून विविध चविष्ट व पौष्टिक पदार्थ सादर केले. यामध्ये अळूची वडी, भारंगीची भाजी, रानभाजीचे थालीपीठ, सुरणाचे कटलेट, रानभाजीचे कबाब, काटल्याची भाजी, अंबाडीचे कटलेट, टोरा व्हेजिटेबल करी, टाकळा-मका भाजी, टोरा टोफू पराठा, कुड्याच्या शेंगांची भाजी अशा विविध पदार्थांची आकर्षक मांडणी विद्यार्थ्यांनी केली होती.

स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम, अभ्यंकर- कुळकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. डी. आर. वालावलकर, जीवशास्त्र विभागप्रमुख श्री. शिंगाडे, चारुदत्त पड्यार उपस्थित होते. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आयोजित केली. स्पर्धेचे परीक्षण जीजीपीएस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पाटणकर, जांभेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संजना तारी यांनी केले. रानभाजीचा वापर, चव, पौष्टिक मूल्य, सर्जनशीलता व नावीन्य, सादरीकरण, रानभाजीविषयीचे ज्ञान आणि स्वच्छता या विविध निकषांच्या आधारे पदार्थांचे परीक्षण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रा. शरद आपटे, डॉ. विराज चाबके, प्रा. प्रियांका शिंदे-अवेरे यांनी विशेष प्रयत्न केले. समन्वयाचे काम जीवशास्त्र विभागातील श्री. पोकळे आणि श्रीमती दातार यांनी पाहिले.

विजेत्यांचा सत्कार

प्रथम क्रमांक- स्वरूपा मंदार आठवले (टाकळ्याचे थालीपीठ), द्वितीय क्रमांक विभागून- संबोधी जितेंद्र कांबळे (टाकळ्याचे पराठे) आणि वेदा विजय पाडावे (अंबाडी कटलेट), तृतीय क्रमांक- कस्तुरी मिथिलेश कीर (सुरणाचे कटलेट), उत्तेजनार्थ पारितोषिक- ऋतुराज जयंत विरकर, श्रीया विवेक गावडे. वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. सोनाली कदम यांच्या संकल्पनेतून याचे नियोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!