शुक्रवारी ‘जलसंधारण दिनी’ राज्यभरात ‘महा वॉकॅथॉन २०२६’चे आयोजन
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागरिकांना सहभागाचे आवाहन

रत्नागिरी : “माती वाचली तर शेती वाचेल आणि पाणी जपले तर उद्याचे भविष्य समृद्ध होईल. पाणी हा केवळ आजचा प्रश्न नसून पुढच्या पिढ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जलसंधारणाची चळवळ ही केवळ शासनाची न राहता प्रत्येक नागरिकाची लोकचळवळ झाली पाहिजे,” असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट हा दिवस राज्यभरात ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राज्यभरात विविध जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत.
‘महा वॉकॅथॉन २०२६’ला (Walk for Water) उद्या (२१ ऑगस्ट) सकाळी ७ वाजता राज्यातील सर्व जिल्ह्यांची मुख्यालये येथून सुरुवात होईल. जल आणि मृद संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करणे, हा या मागचा उद्देश आहे.
१५ ते १९ ऑगस्ट दरम्यान माती आणि जलसंधारण या विषयावर आधारित राज्यस्तरीय रील चॅलेंज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विजेत्यांसाठी शासनामार्फत आकर्षक बक्षिसे ठेवली गेली आहेत. नागरिकांनी जाहिरातीतील QR कोड स्कॅन करून आपली नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना, तरुणांना आणि शेतकऱ्यांना या उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले. “चला, आज एक संकल्प करूया— पाणी अडवूया, पाणी जिरवूया आणि जलसमृद्ध, हरित व संपन्न महाराष्ट्र घडवूया,” असा संदेश त्यांनी दिला.



