अनुदानित शाळांमधील अनुकंपा नियुक्त्या ३१ ऑगस्टपर्यंत मार्गी लावा
शिक्षण संचालकांचे संस्थाचालक, मुख्याध्यापकांना निर्देश

रत्नागिरी : राज्यातील खासगी अनुदानित व अंशत: अनुदानित शाळांमध्ये सेवेत असताना निधन पावलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. या कर्मचाऱ्यांच्या पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळवून देण्यासाठी सुधारित धोरण लागू करण्यात आले असून, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ही सर्व प्रकरणे तातडीने निकाली काढण्याचे निर्देश शिक्षण संचालनालयाने दिले आहेत.
विहित नमुन्यात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन
अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र वारसदारांनी शासन निर्णयासोबत दिलेल्या ‘परिशिष्ट-क’ मधील विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करणे बंधनकारक आहे. संबंधित शाळांचे मुख्याध्यापक व संस्थाचालकांनी या अर्जांची काटेकोर छाननी करून परिपूर्ण प्रस्ताव शिक्षणाधिकारी (योजना) यांच्याकडे वेळेत सादर करायचे आहेत.
त्रुटीपूर्ण किंवा अपूर्ण प्रस्तावांमुळे कार्यवाहीस विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संस्थाचालक व मुख्याध्यापकांची राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.
जिल्हा स्तरावर होणार पडताळणी
शाळांकडून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची पडताळणी संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यामार्फत केली जाईल. शासन नियमांनुसार पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना विहित कालमर्यादेत नियुक्ती देण्याची अंतिम जबाबदारी या विभागावर असेल.
अनुकंपा नियुक्तीचा लाभ हा गरजू कुटुंबांच्या उपजीविकेसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने सर्व शैक्षणिक संस्था, मुख्याध्यापक आणि पात्र उमेदवारांनी समन्वयाने काम करून ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.



