मुख्य बातमी

रत्नागिरीत नगरपालिकेची अतिक्रमणावर पोलीस बंदोबस्तात कारवाई

रत्नागिरी : नगरपालिकेने आजपासून धडक ‘अतिक्रमण हटाव’ मोहिमेला सुरुवात केली आहे. आज सकाळी शहराचा मुख्य आणि गजबजलेला भाग असलेल्या साळवी स्टॉप परिसरामधून या मोहिमेला सुरुवात झाली. पालिकेच्या या अचानक झालेल्या कारवाईमुळे शहरातील अवैध विक्रेते आणि रस्ते व्यापणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते, फूटपाथ आणि सार्वजनिक जागांवर वर्षानुवर्षे वाढलेल्या अतिक्रमणांमुळे नागरिकांना चालणेही कठीण झाले होते. तसेच अनेकदा वाहतुकीचाही खोळंबा होतो. या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनाने आज सकाळपासूनच कारवाईला सुरुवात केली. साळवी स्टॉप परिसरात रस्त्याच्या कडेला असलेली तात्पुरती व कायमस्वरूपी अनधिकृत दुकाने, टपऱ्या, शेड आणि रस्त्यावर लावलेले बेकायदेशीर फ्लेक्स, फलक पालिकेच्या पथकाने जेसीबी आणि इतर उपकरणांच्या साह्याने हटवण्यास सुरुवात केली.

कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून या संपूर्ण कारवाईदरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कडक पहाऱ्यात ही मोहीम राबवण्यात येत आहे.

या धडक कारवाईत पालिकेचे उच्च अधिकारी, अतिक्रमण विरोधी पथकाचे कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. जे नागरिक किंवा व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमण हटवणार नाहीत, त्यांचे साहित्य जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. साळवी स्टॉपवरून सुरू झालेली ही मोहीम आगामी काळात शहरातील इतर प्रमुख रस्ते आणि बाजारपेठेच्या भागांतही तीव्र केली जाणार असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!