अणुस्कुरा घाटात सोळा चाकी ट्रक बंद; वाहतूक ठप्प
मोठी वाहने घाटात अडकली : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहतूक बंद करण्याची मागणी

राजापूर : अणुस्कुरा घाटात मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कोल्हापूरच्या दिशेने जाणारा सोळा चाकी ट्रक तांत्रिक बिघाडामुळे मार्गातच बंद पडल्याने दोन्ही बाजूची वाहतूक काही काळ ठप्प झाली. त्यानंतर रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे कर्मचारी तसेच अणुस्कुरा चेकपोस्टवरील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत एकेरी वाहतूक सुरू केली; मात्र मोठी वाहने घाटात अडकून पडल्याने वाहतुकीचा प्रश्न कायम राहिला.
बंद पडलेला ट्रक अशा ठिकाणी थांबला होता की, तो बाजूला करून वाहतूक सुरळीत करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी तातडीने हालचाली करत दुचाकी तसेच अल्टो, वॅगनार यांसारख्या छोट्या चारचाकी वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू केली. मात्र एसटी बससह इतर मोठी वाहने घाटातच अडकून पडली. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
दरम्यान, बंद पडलेला ट्रक सुरू करून तो मार्गातून हटविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. रात्री अंधारामुळे या कामात काही अडथळे निर्माण होत होते. ट्रक पूर्णपणे हटविल्यानंतरच घाटातील मोठ्या वाहनांची वाहतूक सुरक्षितपणे पूर्ववत होणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून आंबा घाट अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याने कोकणातून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारी मोठ्या वाहनांची वाहतूक अणुस्कुरा घाटमार्गे वळविण्यात आली आहे. त्यामुळे ओणी-अणुस्कुरा मार्गावर अवजड वाहनांचा मोठ्या प्रमाणात भार वाढला असून रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अणुस्कुरा घाटाची सद्यस्थिती, वाढलेली अवजड वाहतूक आणि तोंडावर आलेला गणेशोत्सव लक्षात घेता, घाटमार्गे अवजड वाहनांची वाहतूक तात्पुरती बंद करण्यात यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचा वाढणारा ताण लक्षात घेऊन प्रशासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


