मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

दापोलीची रुई जाधव बनली ‘मुंबई श्रावणक्वीन’

दापोली : मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या मानाच्या ‘श्रावणक्वीन २०२६ ‘ स्पर्धेत आपल्या अष्टपैलू कर्तृत्वाच्या जोरावर दापोली तालुक्यातील शिरशिंगे गावची सुकन्या रुई रवींद्र जाधव हिने ‘मुंबई श्रावण क्वीन’चा किताब पटकावला आहे. शिक्षण, कला, व्यवसाय आणि प्राणीकल्याण अशा विविध आघाड्यांवर लीलया वावरणारी स्पर्धक क्रमांक २ असलेली रुई हिने ठरवून दिलेली चौकट मोडून या स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले आहे.

मास मीडियामधील पदवी, ग्रीन जरनॅलिझमचा अभ्यास, फिल्म मेकिंगमधील दिग्दर्शन, वेब सीरिजमधील अभिनय, व्यावसायिक नाटकांतील नृत्य, कथक व मर्दानी खेळांचा सराव, ‘युवर्स लविंगली, रु’ हा कवितासंग्रह आणि ‘अंबर’ स्टायलिंग स्टुडिओची धुरा सांभाळण्यासोबतच दररोज ३० ते ३५ भटक्या श्वानांना खाऊ घालणारी प्राणिप्रेमी रुई, तिच्या या प्रेरणादायी प्रवासामुळे संपूर्ण सोहळ्यात विशेष चर्चेचा विषय ठरली.

मुंबईतील एका दिमाखदार सोहळ्यात मुंबई श्रावण क्वीन-२०२५ ची विजेती अनघा ठाकूर तसेच वामन हरी पेठे ज्वेलर्सचे निरंजन पेठे, अभिनेत्री श्रेया बुगडे व अभिनेता मिलिंद गवळी यांच्या हस्ते रुई जाधव हिला ‘मुंबई श्रावण क्वीन’चा मुकुट आणि किताब प्रदान करण्यात आला. मराठी मनोरंजनसृष्टीत संयत अभिनयाने ठसा उमटवणारे अभिनेते मिलिंद गवळी, रंगभूमीपासून सिनेसृष्टी व वेब सीष्टीमध्ये वेगळी ओळख निर्माण करणारे अभिनेते संतोष जुवेकर, विनोदाची अचूक जाण असणारी अभिनेत्री श्रेया बुगडे, दिग्दर्शक भीमराव मुडे आणि वेशभूषाकार मानसी अत्तरदे या दिग्गजांनी या स्पर्धेचे अत्यंत परीक्षण केले.

यावेळी निवासी संपादक समीर कर्वे यांनी प्रास्ताविकात स्पर्धा आयोजित करण्यामागची भूमिका विषद करताना, “श्रावण क्वीन स्पर्धेतील विजेत्या व स्पर्धक पुढे आपल्याला रूपेरी पडद्यावर दिसतात. त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या पाठीशी सदैव राहू,” अशी ग्वाही दिली. अभिनेता पृथ्विक प्रताप व अभिनेत्री अदिती द्रविड यांनी या सोहळ्याचे अतिशय खुमासदार सूत्रसंचालन केले, तर स्टॅण्डअप कॉमेडियन मंदार भिडे आणि गायिका मधुरा कुंभार यांच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थित रसिकांची मने जिंकली.

शिरशिंगे गावची कन्या रुई हिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!