धावत्या बसवर विद्युतवाहिनी पडली
संगमेश्वरमधील घटना : महिला वाहकाला विजेचा धक्का, चालक बचावला

संगमेश्वर : संगमेश्वरहून उमरेकडे जाणाऱ्या एसटी बसवर अचानक विद्युतवाहिनी कोसळल्याची घटना फणसवणे-उमरे फाट्यावर आज (२६ ऑगस्ट) सकाळी घडली. धावत्या बसवर विद्युतवाहिनी पडल्याने वाहक प्राजक्ता शिगवण यांना विजेचा धक्का बसून किरकोळ दुखापत झाली. चालक रवींद्र साप्ते यांनी प्रसंगावधान राखल्याने ते सुरक्षित राहिले. बसमध्ये त्यावेळी केवळ एकच प्रवासी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
संगमेश्वर बसस्थानकातून सकाळी सातच्या सुमारास चालक रवींद्र साप्ते हे उमरे एसटी बस (क्र. एमएच २० बीएल २१४८) घेऊन निघाले होते. बस फणसवणे नाका परिसरातील उमरे फाट्यावर, रामदास मिसळ स्टॉलजवळ पोहोचली असता विद्युत खांबाच्या सपोर्टचा ताण तुटल्याने विद्युतप्रवाह असलेली वाहिनी अचानक बसवर कोसळली.
विद्युतवाहिनी बसच्या संपर्कात येताच वाहक प्राजक्ता शिगवण यांना जोरदार विजेचा धक्का बसला. त्यांनी तत्काळ सीटचा आधार घेतल्याने परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्यापासून बचावली. त्याचवेळी विद्युतप्रवाह खंडित झाल्याने मोठा अनर्थ टळला. शिगवण यांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात आले.
चालक साप्ते हे चालकाच्या सीटवर अधांतरी स्थितीत असल्याने विद्युतवाहिनीच्या थेट संपर्कात आले नाहीत. त्यामुळे तेही सुरक्षित राहिले. बसमधील एकमेव प्रवासी सीटला टेकून बसला होता. त्याच्या पायात चप्पल असल्याने त्यालाही विजेचा धक्का जाणवला नसल्याची माहिती आहे.
घटनेनंतर परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ महावितरणला माहिती दिली. त्यानंतर लाइनमन होडे सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि विद्युतवाहिनी हटवून मार्ग सुरक्षित केला.
या घटनेमुळे रस्त्यालगतच्या विद्युत यंत्रणेच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील विविध भागांमध्ये जीर्ण विद्युत खांब, तारा आणि वाहिन्यांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. मोठी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता रस्त्यालगतच्या विद्युत खांबांची आणि वाहिन्यांची तातडीने तपासणी करून धोकादायक यंत्रणा दुरुस्त करावी, अशी मागणी होत आहे.
फणसवणे येथील या घटनेत बसमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्याने अनर्थ टळला. मात्र धावत्या एसटीवर विद्युतवाहिनी कोसळण्याच्या घटनेने विद्युत सुरक्षेच्या उपाययोजनांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज अधोरेखित केली आहे.


