पतंजलीच्या प्रमुख योगशिक्षिका मधुरा लाकडे यांचा योग वर्ग रत्नागिरीत सुरू

रत्नागिरी : पतंजलीच्या प्रमुख योगशिक्षिका मधुरा लाकडे यांनी शिवोऽहम् योग वर्गास कुवारबाव (रत्नागिरी) येथे सुरुवात केली आहे. सध्याच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनात शरीराला आणि मनाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी योग हा महत्त्वपूर्ण माध्यम बनला आहे. याचाच विचार करून योगाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन प्रमुख योग शिक्षिकेची दीक्षा मिळवत हा वर्ग रत्नागिरीकरांसाठी सुरू केला आहे.
पतंजली योग समिती हरिद्वार तर्फे घेण्यात आलेल्या सहयोग शिक्षक परीक्षेत मधुरा लाकडे यांनी प्रात्यक्षिक परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. महाराष्ट्रातून एकूण ३६ महिला या परीक्षेला बसल्या होत्या. त्यानंतर त्या एवढ्यावरच न थांबता प्रमुख योग शिक्षिकेसाठी तयारी करण्यास सुरुवात केली. मधुरा यांना योग गुरु नीताताई साने यांचे मार्गदर्शन लाभले. नीता साने यांच्याकडे खूप विद्यार्थी योग शिक्षण घेत आहेत. परंतु प्रमुख योग शिक्षिकेसाठी जाणाऱ्या मधुरा या त्यांच्या प्रथम विद्यार्थिनी आहेत.
नुकत्याच मधुरा यांनी दहा दिवस पतंजली उत्तराखंड येथे जाऊन प. पू. स्वामी रामदेव बाबा यांच्याकडून प्रशिक्षण घेत प्रमुख योग शिक्षिकेची दीक्षा मिळवली. तिथे प्रत्येक आजारावरचे योग वेगवेगळ्या पद्धतीने शिकवले जातात. त्यांच्या प्रशिक्षणामुळे खूप ज्ञानात भर पडली. आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन मी पश्चिम महाराष्ट्र पतंजली रत्नागिरी जिल्ह्यातील तिसरी प्रमुख योग शिक्षिका झाले, असे मधुरा लाकडे यांनी सांगितले.



