मुख्य बातमी

एनसीएमसी कार्ड सक्तीविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बस नियोजनाबाबत रत्नागिरीत विभाग नियंत्रकांना निवेदन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘एनसीएमसी’ अनिवार्य केल्यामुळे प्रवाशांचे होत असलेले हाल थांबवण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली २ सप्टेंबर रोजी एसटी महामंडळाच्या रत्नागिरी विभाग नियंत्रकांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनासोबतच आगामी गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांच्या व स्थानिक प्रवाशांच्या सुलभ प्रवासासाठी बस नियोजनावर देखील प्रशासनासोबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.

एसटी महामंडळाने १ सप्टेंबरपासून एनसीएमसी कार्डशिवाय सवलतीचे तिकीट नाकारण्याचा निर्णय लागू केला आहे. मात्र, प्रशासकीय आणि तांत्रिक त्रुटींमुळे ग्रामीण भागातील हजारो पात्र लाभार्थी अजूनही या कार्डापासून वंचित आहेत. केवळ ८२ दिवसांच्या कालावधीत सर्व प्रवाशांना कार्ड देणे शक्य नव्हते. त्यातच वीजपुरवठा खंडित होणे, सर्वर डाउन, इंटरनेट आणि बायोमेट्रिक मशीनमधील बिघाड यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना फेऱ्या मारूनही कार्ड मिळालेले नाही. परिणामी, ग्रामीण भागात कार्ड स्वाइप होत नसल्यामुळे महिला आणि वृद्धांना सवलतीऐवजी सक्तीने पूर्ण तिकीट काढावे लागत असून, आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधताना शिवसेनेने निवेदनात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत.

जोपर्यंत सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना प्रत्यक्ष कार्ड मिळत नाही, तोपर्यंत त्यांना पूर्वीप्रमाणेच ओळखपत्रावर सवलतीचे तिकीट दिले जावे. ज्या प्रवाशांनी नोंदणी केली आहे परंतु कार्ड मिळालेले नाही, त्यांना नोंदणी पावती किंवा टोकन क्रमांकाच्या आधारे तात्पुरती सवलत देण्यात यावी. तसेच, “कार्ड नाही म्हणून सवलत नाही” या जाचक नियमाची सक्ती तात्काळ स्थगित करून, ग्रामीण भागातील तांत्रिक अडचणींचा भार प्रवाशांवर न टाकता पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, रत्नागिरी विभागातील सर्व आगार आणि प्रमुख बसस्थानकांवर पुरेशी एनसीएमसी केंद्रे व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा आग्रह धरण्यात आला आहे.

गणेशोत्सवात नियमित गाड्यांवर परिणाम होऊ न देण्याची मागणी निवेदन सादर करताना आगामी गणेश चतुर्थीच्या काळातील एसटीच्या नियोजनावर विशेष चर्चा करण्यात आली. कोकणातील सर्वात मोठ्या सणासाठी मुंबई-पुण्याहून लाखो चाकरमानी गावी येतात. या काळात अतिरिक्त गाड्यांचे नियोजन करताना जिल्ह्यातील नियमित (लोकल) बस फेऱ्यांवर कोणताही परिणाम होऊ नये, हे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला ठणकावून सांगितले. चाकरमान्यांच्या सेवेसाठी स्थानिक प्रवाशांची, शालेय विद्यार्थ्यांची आणि ग्रामीण भागातील नियमित वाहतूक विस्कळीत होऊ नये, तसेच नेहमीच्या प्रवाशांना हक्काच्या गाड्या वेळेवर उपलब्ध व्हाव्यात, असे स्पष्ट नियोजन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.हे महत्त्वपूर्ण निवेदन आज प्रशासनाला सुपूर्द करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रत्नागिरी (दक्षिण) जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्यासह उप जिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील आणि उपतालुका प्रमुख विजय देसाई तसेच रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, पावस विभाग प्रमुख किरण तोडणकर, महिला तालुका प्रमुख ममता जोशी, महिला शहर प्रमुख सेजल बोराटे, लांजा महिला संघटिका आसावरी मांडवकर, नगरसेविका फौजिया मुजावर, शिरगाव महिला विभाग प्रमुख आस्था धांगडे, कोतवडे महिला विभाग प्रमुख साक्षी साळुंखे, लांजा युवा उपसंघटिका दिव्या मांडवकर, लेखिका व महिला शिवसैनिक मेघा कोल्हटकर, राजापूर शहर युवती अधिकारी गार्गी शिर्के आणि स्नेहा उगले यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एसटी प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!