मतदारयादीविषयी हरकती व त्रुटी असल्यास नोंदवाव्यात : कोकण विभागीय आयुक्त रुबल अगरवाल
राजापूर नगरपालिकेत मतदारयादी सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची पाहणी : शहराच्या विकासासाठी प्रशासकीय सहकार्याची ग्वाही

रत्नागिरी : मतदारयादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ अंतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीबाबत काही हरकती किंवा त्रुटी असल्यास त्या तातडीने प्रशासनाकडे कळवाव्यात, तसेच पात्र नागरिकांकडून नवीन मतदार नोंदणीसाठी ‘अर्ज क्र. ६’ भरून घ्यावा, अशा सूचना कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार यादी निरीक्षक रुबल अगरवाल यांनी दिल्या.
श्रीमती अगरवाल यांनी गुरुवारी राजापूर नगरपालिकेला भेट देऊन तेथे प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादीची प्रत्यक्ष पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना केल्या.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी राजापूरच्या नगराध्यक्ष ॲड. हुस्नबानू खलिफे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, अपर आयुक्त फरोग मुकादम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड, प्रांताधिकारी विश्वजीत गाताडे, तहसीलदार विकास गंबरे, नगरसेवक जमीर खलिफे यांच्यासह महसूल व नगरपालिका प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त श्रीमती अगरवाल यांनी नगराध्यक्ष ॲड. खलिफे यांच्याशी राजापूर नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा केली. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राजापूर नगरपालिकेतील पाहणी पूर्ण करून त्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यासाठी रवाना झाल्या.


