नवनिर्माण हायस्कूलमध्ये गणेश चतुर्थीनिमित्त विविध कलात्मक उपक्रम साजरे

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था संचलित नवनिर्माण हायस्कूलमध्ये गणेश चतुर्थी निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध कलात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचे आगमन लवकरच होणार आहे याचे औचित्य साधून,विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळावा आणि भारतीय संस्कृती व सणांविषयी त्यांना आपुलकी निर्माण व्हावी या उद्देशाने हे उपक्रम घेण्यात आले.
इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी शाडूपासून गणेश मूर्ती बनवण्याच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पकतेने आकर्षक मातीच्या लहान मोठ्या आकाराच्या सुबक गणेश मूर्ती तयार केल्या. पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांनी गणेशाचे चित्र रंगवण्याचा आणि ते सुंदर सजवण्याचा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वतः गणेशाचे चित्र काढून ते रंगविले ते सजविले . या संपूर्ण कार्यशाळेचे मार्गदर्शक आणि चित्रकलेचे शिक्षक निखिल कांबळे यांनी मुलांना उत्कृष्ट मार्गदर्शन करून त्यांच्याकडून शाडूच्या मूर्ती तयार करून घेतल्या. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आणि कल्पनाशक्तीला सुंदर व्यासपीठ मिळाले. शाडूच्या मातीपासून अशा प्रकारच्या मूर्ती तयार होतात याचे ज्ञानही विद्यार्थ्यांना मिळाले. तसेच अशा प्रकारचे गणपती हे पर्यावरण पूरक असू शकतात याबद्दलची संकल्पना देखील सोनाली पाटील आणि ऋतुजा वझे यांनी माहितीच्या माध्यमातून स्पष्ट केली. सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहाने या उपक्रमांचा आनंद दोन दिवस घेतला.
या उपक्रमासाठी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सहभाग ही मोलाचा होता. संचालिका सौ सीमा हेगशेट्ये आणि मुख्याध्यापिका प्रज्ञा झरापकर यांनी या उपक्रमाचे अभिनंदन केले.



