मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या मुंबईतील २२ वर्षीय तरुणाचा खाडीत बुडून मृत्यू

मेढे मांजरे येथील जांभळी बंदरावरील दुर्घटना; एनडीआरएफ पथकाला सापडला मृतदेह

संगमेश्वर : गणेशोत्सवाचा आनंद साजरा करण्यासाठी मुंबईहून गावी आलेल्या अथर्व राजेश देसाई (वय २२) या तरुणाचा खाडीच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोहता येत नसतानाही ओहोटीच्या पाण्याच्या प्रवाहात उडी मारल्याने हा अपघात घडला. मेढे मांजरे जवळील जांभळीचे बंदर येथे सोमवारी घडलेल्या या घटनेनंतर मंगळवारी सायंकाळी ‘एनडीआरएफ’च्या पथकाने त्याचा मृतदेह शोधून काढला. अथर्व नुकताच इंजिनिअर झाला होता; त्याच्या आकस्मिक जाण्याने देसाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

मुंबईत वास्तव्यास असणारा अथर्व आपल्या पालकांसोबत मेढे मांजरे-कळकदेकोंड येथे गावी आला होता. सोमवारी सायंकाळी ५:३० च्या सुमारास अथर्व आणि मुंबईतून आलेले त्याचे मित्र निर्मित मितेश देसाई, यश गणेश देसाई, शुभम गणेश देसाई व वेदांत मनीष देसाई हे घरात कोणालाही न सांगता जांभळी बंदरावर पोहायला गेले. सर्वजण पाण्यात उतरले तेव्हा खाडीत ओहोटी सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. मित्रांपैकी कोणालाही उत्तम पोहता येत नव्हते, तर अथर्वला अजिबात पोहता येत नव्हते. तरीही अथर्वने पाण्यात उडी घेतली आणि पाण्याच्या प्रवाहात तो बुडू लागला. हे पाहून घाबरलेल्या मित्रांनी वाडीत धाव घेऊन ग्रामस्थांना माहिती दिली. ग्रामस्थ व नातेवाईकांनी तत्काळ पाण्यात उतरून शोध घेतला, मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि अंधारामुळे अथर्वचा थांगपत्ता लागला नाही.

घटनेची माहिती मिळताच डिंगणी दूरक्षेत्र व संगमेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक गावीत, हेड कॉन्स्टेबल मांढरे, कॉन्स्टेबल म्हस्कर आणि होमगार्ड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने रात्रभर होड्यांमधून शोधमोहीम राबवली. मात्र यश न आल्याने पोलिसांनी जिल्हा प्रशासनाला पाचारण केले. रत्नागिरीचे प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी तत्काळ राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकाला घटनास्थळी बोलावले. मंगळवारी एनडीआरएफच्या दोन पथकांनी खाडीत शोध मोहीम राबवत सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास अथर्वचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

अचानक पडणारा पाऊस, नदीच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ आणि खाडीतील भरती-ओहोटीचे चढ-उतार यामुळे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान असतो. स्थानिक भौगोलिक स्थिती आणि पाण्याचा अंदाज नसल्यास मुंबई किंवा इतर शहरांतून गावी येणाऱ्या चाकरमान्यांनी अथवा पर्यटकांनी अशा धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरून आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!