भूमी अभिलेख विभागाची महसूल लोकअदालत २२ सप्टेंबरला
प्रलंबित अपील प्रकरणांचा होणार जलद निपटारा

रत्नागिरी : जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयाशी संबंधित अर्धन्यायिक प्रलंबित अपील प्रकरणांचा तातडीने निपटारा व्हावा, या उद्देशाने २२ सप्टेंबर रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले महसूल लोक अदालत अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ही लोकअदालत दुपारी १ वाजता जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी येथे पार पडेल.
पक्षकारांमधील वाद सामोपचाराने मिटवणे, वेळ व न्यायालयीन खर्च वाचवणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. ज्या प्रकरणांमध्ये दोन्ही पक्षकार आपापसातील संमतीने वाद मिटवण्यास तयार आहेत, अशा दाव्यांचा यामध्ये तातडीने निकाल लावला जाणार आहे.
रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, लांजा आणि राजापूर या सर्व नऊ तालुक्यांतील अपीलकर्ते यात अर्ज करू शकतात. महसूल व वन विभागाच्या नियमांनुसार इच्छुक पक्षकारांना ‘प्रपत्र अ’ मधील महसूल लोकअदालत तडजोडनामा अर्ज भरावा लागेल. परस्पर संमतीच्या (Consent Terms) आधारे प्रकरणांचा निपटारा केला जाईल.
अधिक माहिती व मार्गदर्शनासाठी जिल्हा अधीक्षक भुमी अभिलेख कार्यालयाच्या ०२३५२-२२२८६३ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. जिल्ह्यातील नागरिकांनी या लोकअदालतीचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपली प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने सोडवावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी केले आहे.



