मुख्य बातमी

मतदार नोंदणीसाठी शेवटचे १५ दिवस शिल्लक

३० सप्टेंबरपर्यंत दावे व हरकती नोंदवण्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीतील दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या टप्प्यातील शेवटचे १५ दिवस शिल्लक असून जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी युद्धपातळीवर विशेष नोंदणी मोहीम राबवावी, असे निर्देश उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.

ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादीचे पुनरीक्षण न झाल्यामुळे तसेच स्थलांतरित झालेले व १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे सर्व नवमतदार या मोहिमेत मतदार नोंदणीस पात्र आहेत. संबंधित नागरिकांनी ‘प्रपत्र-६’ व घोषणापत्र भरून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट करून घ्यावे.

प्रशासनाला दिलेल्या प्रमुख सूचना:

शाळा-महाविद्यालयांमध्ये शिबिरे : सर्व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांमधील ‘निवडणूक साक्षरता मंच’ (ELC) मार्फत नवमतदारांचे ऑनलाईन व ऑफलाईन अर्ज भरून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत.

सोशल मीडिया व डिजिटल मोहीम : अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून रील्स, माहितीपर पोस्ट्स, शॉर्ट व्हिडीओ आणि इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जनजागृती करावी.

आस्थापना व गृहनिर्माण सोसायट्या : उद्योग समूह, कंपन्या व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘मतदार जागृती मंच’ द्वारे सत्रे आणि १०० टक्के मतदार नोंदणी शिबिरे घ्यावीत.

समाजातील वंचित घटकांवर विशेष भर : तृतीयपंथी, दिव्यांग व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आदिवासी समूह (PVTGs) तसेच भटके-विमुक्त घटकांसाठी संबंधित विभाग व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने क्षेत्रनिहाय केंद्रे सुरू करून प्रत्यक्ष नोंदणी करावी.

सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्धी : एसटी बसस्थानके, बसेस, रेल्वे, शासकीय-निमशासकीय कार्यालये, बँका, पोस्ट, नगरपालिका व चित्रपटगृहांमध्ये पोस्टर्स व डिजिटल डिस्प्लेद्वारे प्रचार करावा. यासाठीचे प्रचार साहित्य गुगल ड्राईव्ह लिंकवर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

केवळ जनजागृती न करता प्रत्येक पात्र नागरिकाची प्रत्यक्ष नोंदणी पूर्ण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकारी यांनी साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून मोहिमेची प्रगती तपासावी, असे निर्देशही राहुल गायकवाड यांनी दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!