महाराष्ट्रमुख्य बातमीशैक्षणिक

दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखांचा कालावधी राज्य मंडळाकडून जाहीर

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. जाहीर कालावधीनुसार बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, दहावीच्या लेखी परीक्षेला १५ फेब्रुवारीपासून प्रारंभ होईल. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी यासंदर्भातील परीक्षांच्या तारखांची घोषणा केली आहे.

राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊही विभागीय मंडळांमार्फत या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. बारावीची लेखी परीक्षा ८ फेब्रुवारी ते १६ मार्च या कालावधीत चालेल, तर त्यापूर्वी २० जानेवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेतल्या जातील. त्याचप्रमाणे दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारी ते ११ मार्चदरम्यान होणार असून, त्यांच्या प्रात्यक्षिक, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत पूर्ण कराव्या लागतील.

लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या विषयानुसार तपशीलवार अंतिम वेळापत्रक राज्य मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षांचे वेळापत्रक समोर आल्यामुळे आता राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यासाची तयारी गतिमान केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!