‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ साठी लोगो स्पर्धेस ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

रत्नागिरी : जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या “सिंधुरत्न समृद्ध योजना २.०” योजनेची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी आकर्षक, अर्थपूर्ण व जिल्ह्याची वैशिष्ट्ये प्रतिबिंबित करणारा अधिकृत लोगो निश्चित करण्यासाठी २१ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत जिल्हास्तरीय लोगो स्पर्धा आयोजित केली होती. या जिल्हास्तरीय लोगो स्पर्धस ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व इच्छुक नागरिक, विद्यार्थी, कलाकार, ग्राफिक डिझायनर्स व कला/ डिझाईन क्षेत्रातील व्यक्ती या स्पर्धत सहभागी होऊ शकतात. आपली कल्पकता दाखवून जिल्ह्याच्या विकासाचे मानचिन्ह साकारणाऱ्या विजेत्यास १० हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल.
तुमच्या कल्पक डिझाइनमध्ये रत्नागिरीची खरी ओळख उमटायला हवी. यामध्ये सागरी वैभव (निळाशार समुद्र, समृद्ध मत्स्यव्यवसाय व बंदरे), निसर्ग व कृषी (सह्याद्रीची हिरवाई, पर्यटन आणि जगप्रसिद्ध हापूस), प्रगतीची नवी दिशा (कोकणी संस्कृती, रोजगारनिर्मिती, आधुनिक उद्योजकता आणि शाश्वत विकास) या घटकांचा विचार करणे आवश्यक आहे.
डिझाइन व तांत्रिक निकष
स्वरूप: लोगो JPG किंवा PNG फॉरमॅटमध्ये पाठवावा (शक्य असल्यास CorelDRAW, PDF, EPS किंवा Vector फाईल जोडावी).
संकल्पना नोट: लोगोचा अर्थ व त्यामागील विचार स्पष्ट करणारे १०० ते १५० शब्दांचे टिपण जोडणे अनिवार्य आहे.
उपयोगिता: लोगो डिजिटल मीडियापासून ते शासकीय फलक, लेटरहेड व पुस्तकांपर्यंत सर्व आकारांत सुस्पष्ट व प्रभावी दिसणारा असावा.
मूल्यांकन: मौलिकता, आकर्षक रंगसंगती, साधेपणा आणि योजनेच्या उद्दिष्टांशी सुसंगतता या निकषांवर १०० गुणांमधून परीक्षण होईल.
महत्त्वाचे नियम –
डिझाइन पूर्णपणे स्वतःचे व मूळ (Original) असावे; कोणत्याही प्रकारची नक्कल आढळल्यास प्रवेशिका बाद ठरेल.
* कोणत्याही राजकीय, धार्मिक, जातीय भावना दुखावणारे घटक अथवा अधिकृत शासकीय राजमुद्रा वापरण्यास सक्त मनाई आहे.
* निवडलेल्या बोधचिन्हाचे सर्व कॉपीराइट्स व हक्क ‘सिंधुरत्न कार्यकारी समिती’कडे राखीव राहतील.
स्पर्धेत कसे सहभागी व्हाल?
अंतिम मुदत : ३० सप्टेंबर २०२६, सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत.
ई-मेल पत्ता : dporatnagiri@gmail.com
प्रत्यक्ष अर्ज : जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी.



