मुख्य बातमी

थिबा पॅलेस रस्त्यावर (रत्नागिरी) चारचाकी चालकाचा धुडगूस

रविवारी मध्यरात्रीची घटना : मालमत्तेचे नुकसान

रत्नागिरी : शहरातील थिबा पॅलेस रोडवर रविवारी (ता. २०) मध्यरात्री एका चारचाकी चालकाने प्रचंड धुडगुस घातल्याची घटना घडली. हलगर्जीपणे वाहन चालवत चालकाने जिओ कंपनीचा पोल, एका बंगल्याचे गेट, कंपाऊंड वॉल आणि रस्त्यावरील दुसऱ्या एका अल्टो कारला धडक देऊन मोठे नुकसान केले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा प्रकार २० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११:३० वाजण्याच्या सुमारास अमानत बंगलो समोरील रोड, थिबा पॅलेस रोड येथे घडला. फिर्यादी फतिन फकीर महम्मद वास्ता(रा. अमानत बंगला, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत सचिन नाना बुलाखे हा एमएच ०२ डी झेड ५९४१ क्रमांकाची चारचाकी गाडी मथुरा हॉटेल ते चंद्रशेखर डेअरी दिशेने भरधाव व बेदरकारपणे चालवून नेत होता.

यादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडीने प्रथम जिओ कंपनीच्या पोलला धडक दिली. त्यानंतर तक्रारदाराच्या बंगल्याचे गेट आणि कंपाऊंड वॉलला जोरदार धडक देऊन नुकसान केले. एवढेच नव्हे तर पुढे जाऊन आणखी एका अल्टो कारला (एमएच ४३ एएन ९९९७) सुद्धा धडक दिली. या अपघातात दुसऱ्या गाडीच्या मालकाची कोणतीही तक्रार नसली, तरी फिर्यादीच्या मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२४(४) नुसार अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेची नोंद रात्री १२:५१ वाजता पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील कायदेशीर कारवाईसाठी तक्रारदाराला न्यायालयात दाद मागण्याची समज देण्यात आली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार जाधव करत आहेत. मध्यरात्री घडलेल्या या थरारामुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!