मुख्य बातमी

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत प्रभातफेरी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष व यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजचा संयुक्त उपक्रम

रत्नागिरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि मंत्रालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांच्या विशेष समन्वयाने संपूर्ण राज्यभरात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वकांक्षी उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सलग १० दिवस नागरिकांना जवळच्या शासकीय आरोग्य संस्था व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये मोफत आरोग्य तपासणी, निदान व आवश्यक सेवा उपलब्ध करून देणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. याच उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील नागरिकांना सहज सुलभ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळवून देण्यासाठी उपकेंद्र ते जिल्हा रुग्णालय स्तरावर विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. आज जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने शहरात जनजागृतीपर प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले होते.

शहरातील मारुती मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गावर ही प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत पार पडणाऱ्या मोफत आरोग्य शिबिरांची माहिती देणारे फलक हातात घेण्यात आले होते. तसेच, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामार्फत विविध गंभीर आजारांच्या उपचारांसाठी मिळणारी आर्थिक मदत आणि त्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

या प्रभातफेरीत यश फाऊंडेशन नर्सिंग कॉलेजचे प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सावंत व समाजसेवा अधीक्षक केदार ढेकणे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल डॉ. सुमित सावंत यांनी यश फाऊंडेशनचे संचालक, प्राध्यापक, व विद्यार्थी वर्गाचे विशेष आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!