सूर्या ग्रुप संघटनेतर्फे विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील सूर्या ग्रुप संघटना, मोहितेवाडी – तांबे वाडी, खोडदे यांच्या वतीने यावर्षी ही गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेला विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावे, त्यांच्यामध्ये शैक्षणिक आवड निर्माण व्हावी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून जपली जाणारी ही आधुनिक परंपरा यावर्षीही त्याच उत्साहाने पुढे नेण्यात आली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अनेक मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कार्यसेवकांनी आपला बहुमूल्य वेळ देत अथक परिश्रम घेतले. संघटनेने दिलेली “साद” आणि वाडीतील देणगीदारांनी दिलेला “हात आणि दाखवलेला विश्वास” यामुळे हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम यशस्वीपणे उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.
यावेळी देणगीदारांच्या सन्मानार्थ आयोजित लकी ड्रॉ उपक्रमालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देणगीदारांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या उपक्रमामध्ये वैभव तांबे यांनी आपल्या अनोख्या शैलीत कार्यक्रमातील उत्साहात आणखी भर पाडली. संघटना आणि काळ पुढे जात असताना त्यातून शिकणे, झालेल्या चुका सुधारण्याचा सातत्याने प्रयत्न करणे आणि भविष्यात आणखी चांगले करण्यासाठी एकत्रितपणे पुढे जाणे या विचारधारेने सूर्या ग्रुप संघटना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य मोहिते आणि महेश मोहिते यांनी केले. सर्व विद्यार्थी, पालक, देणगीदार, मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, कार्यसेवक आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळे “विद्यार्थी गुणगौरव सोहळा यशस्वीपणे संपन्न झाला.

