राजापूर नगरपालिकेतर्फे २१ दिवसीय योगासन शिबिराला सुरुवात
‘अभिमानाची १५० वर्षे’निमित्त आयोजन : नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते उद्घाटन

राजापूर : नगरपालिकेच्या ‘अभिमानाची १५० वर्षे’ या गौरवशाली वर्धापन वर्षानिमित्त शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या वतीने २१ दिवसीय योगासन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत राजीव गांधी क्रीडांगण येथील ॲक्टिव्हिटी सेंटरमध्ये हे शिबिर सुरू असून, योगशिक्षक मुकेश नाचरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण दिले जात आहे.
शिबिराचे उद्घाटन राजापूरच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती शबाना मुल्ला, सामान्य प्रशासन विभागाचे लिपिक प्रथमेश वनगुळे, सभा लिपिक अजिंक्य कांबळे तसेच शिबिरातील प्रशिक्षणार्थी मानसी जितेंद्र जाधव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा ॲड. खलिफे यांनी योगासनांचे महत्त्व विशद केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत होते. निरोगी व तणावमुक्त जीवनशैलीसाठी योगासनांचा नियमित सराव आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशिक्षणार्थींनी या शिबिराचा लाभ घेऊन आपल्या दैनंदिन जीवनात योगासनांचा समावेश करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणे, शारीरिक तंदुरुस्ती वाढविणे आणि योगाभ्यासाची आवड निर्माण करणे, हा मुख्य उद्देश आहे. नगरपरिषदेच्या वर्धापन वर्षानिमित्त राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष विनय गुरव, समिती सदस्य तथा नगरसेवक सिद्धांत जाधव, राहुल तांबे आणि सान्वी रावण यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगशिक्षक मुकेश नाचरे यांनी केले. राजापूर नगरपालिकेच्या १५० व्या वर्धापन वर्षानिमित्त आयोजित या योगासन शिबिरामुळे नागरिकांना निरोगी जीवनशैलीचा संदेश मिळत असून, प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.



