मुख्य बातमी

गणपतीपुळे येथे अंगारकी संकष्टी चतुर्थीची जय्यत तयारी

रत्नागिरी : तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे आज (२० सप्टेंबर) असलेल्या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान, स्थानिक प्रशासन आणि पोलिस विभागाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे. पहाटेपासून श्री देव गणपतीचे दर्शन भाविकांसाठी खुले केले करण्यात आले आहे. श्रींच्या दर्शनासाठी हजारो भाविक दाखल होणार असल्यामुळे गणपतीपुळे किनाऱ्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे. मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या भाविकांसाठी मंदिरामध्ये मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांना सुलभ व शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर प्रशासनाकडून दर्शनरांगांचे आणि बॅरिकेडिंगचे विशेष नियोजन केले आहे. पहाटेपासून श्री देव गणपतीचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात आले असून, रात्री चंद्रोदयपर्यंत मंदिर अविरत सुरू राहणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. गणपतीपुळे येथील समुद्रकिनाऱ्यावर भाविक आणि पर्यटकांची मोठी गर्दी होत असल्याने किनाऱ्यावर कडक बंदोबस्त ठेवला आहे.

सुरक्षेच्यादृष्टीने परिसरात सुमारे १५० पोलिसांचा फौजफाटा तैनात केला आहे. समुद्रात दुर्घटना घडू नये यासाठी किनाऱ्यावर सहा प्रशिक्षित जीवरक्षकांची नियुक्ती केली आहे. भाविक आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने मूलभूत सुविधांवर भर दिला आहे. मुख्य रस्ते आणि परिसरातील मार्गांवरील खड्डे बुजवून रस्त्यांची दुरुस्ती व साफसफाई करण्यात आली आहे. रात्रीच्यावेळी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी संपूर्ण मंदिर आणि परिसर भागात पुरेशी प्रकाशव्यवस्था उभारली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!