मुख्य बातमी

रत्नागिरीत उद्यापासून रंगणार शास्त्रीय संगीत सोहळा

समर्पण २०२६ : विदुषी डॉ. अलका देव-मारुलकर अमृत महोत्सव

रत्नागिरी : नामवंत शास्त्रीय गायिका विदुषी डॉ. अलका देव मारुलकर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त “समर्पण २०२६” हा कै. सुरेश आणि शशिकांत डुबळे स्मृति बारावा शास्त्रीय संगीत समारोह रत्नागिरीत येत्या २ व ३ ऑक्टोबरला आयोजित करण्यात आला आहे. पर्वरी गोवा येथील प्रियांशु सांस्कृतिक संस्था, कला व संस्कृती संचालनालय, गोवा आणि स्वराभिषेक-रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने हा संगीत सोहळा गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृहात होणार आहे. रत्नागिरीकर रसिकांसाठी डॉ. अलका देव-मारुलकर यांच्यासह गोवा आणि रत्नागिरीतील शास्त्रीय गायक कलाकारांच्या गायनाची पर्वणी लाभणार आहे.

शुक्रवारी (ता. २) दुपारी साडेतीन वाजता मैफलीला सुरवात होईल. स्वराभिषेकचे शिष्य मीरा बापट, स्वरा भागवत, मृणाल जोशी, हर्षदा सावंत, मधुरा लाकडे, ऋग्वेदा हळबे, दिया परब, ऋग्वेद तेरेदेसाई, साई शिर्के, अन्वी आठल्ये आणि नीलश्री लोटलीकर यांचे ईश्वस्तवन व रागगायन होईल. त्यानंतर विदुषी डॉक्टर अलका देव मारुलकर यांचे गायन होईल. त्यांना सुप्रसिद्ध संवादिनीवादक अजय जोगळेकर (संवादिनी) आणि आणि गोव्याचे डॉ. उदय कुलकर्णी (तबला) हे साथसंगत करणार आहेत. शनिवारी (ता. ३) सकाळच्या सत्रात साडेनऊ वाजता तन्वी मोरे, चैतन्य परब (रत्नागिरी) आणि गोव्याच्या डॉ. शिल्पा डुबळे परब यांचे गायन होईल. दुपारच्या सत्रात स्वराभिषेकच्या शिष्या दीप्ती आगाशे, ऐश्वर्या सावंत, गौतमी वाडकर, राधा केळकर यांच्यासह गोव्याच्या श्रेया देवधर, तेजा ढवळीकर, समीक्षा भोबे काकोडकर, स्वराभिषेकच्या संचालिका विनया परब आणि डॉ. शिल्पा डुबळे यांचे गायन होणार आहे.

दोन दिवसांच्या या महोत्सवात हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन, मंगेश मोरे, वरद सोहनी, तर तबलासाथ केदार लिंगायत, प्रथमेश शहाणे, अभिषेक भालेकर आणि उत्पल सायनेकर (मुंबई) हे करणार आहेत. ध्वनी संयोजन एस. कुमार साऊंडचे उदयराज सावंत यांचे आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून संगीत रसिकांनी या महोत्सवातील कलाकारांच्या गायनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

डॉ. वर्षा भावे यांचा सन्मान

कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ संगीत समुपदेशक, संगीतकार, गायिका आणि मुंबईतील कलांगणच्या संस्थापिका डॉ. वर्षा भावे यांचा सन्मान करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!