कोकणातील लोकसंस्कृतीविषयी कथा, लेख आणि रील स्पर्धा

रत्नागिरी : येथील कोकण मीडियाच्या दिवाळी अंकाच्या निमित्ताने कोकणातील लोककला आणि लोकसंस्कृती या विषयावर लेख स्पर्धा, कथा स्पर्धा आणि रील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कोकण मीडियाचा अकरावा दिवाळी विशेषांक यंदा प्रसिद्ध होणार आहे. त्यानिमित्ताने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दशावतार, नमन-खेळे, जाखडी नृत्य, पालखीनृत्य, समई नृत्य, चित्रकथी, रोंबाट, कळसूत्री बाहुल्यांचे खेळ, डबलबारी भजन, शक्ती-तुऱ्यांचे सामने, फुगड्या, टिपऱ्या, भोवत्या असे लोककलांचे कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण प्रकार कोकणात प्रचलित आहेत. काळानुसार त्यात काही बदल होत गेले असले, तरी पुढच्या पिढ्यांनी या परंपरा जपून ठेवल्या आहेत. तसेच, कोकणातील गणपती आणि शिमगा या महत्त्वाच्या उत्सवांसह अन्य वेळीही इथली लोकसंस्कृती अनुभवायला मिळते. प्रत्येक गावाच्या विशिष्ट अशा परंपरा आहेत आणि अनेक ठिकाणी त्या आजही पाळल्या जातात.
या वैशिष्ट्यपूर्ण लोककला आणि लोकसंस्कृतीविषयीच्या माहितीचे संकलन करण्याच्या दृष्टीने लेख, रील आणि कथा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याशिवाय अन्य विषयांवरील माहितीपर लेख, ललित लेख, कथा, कविता, चित्र, व्यंगचित्र, इत्यादी साहित्यही पाठविता येईल. सविस्तर माहिती सोबतच्या लिंकवर उपलब्ध होईल.
साहित्य पाठवण्यासाठी अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२६ असून संपादक, कोकण मीडिया, कुसुमसुधा, ६९७, रामचंद्रनगर (श्रीनगर), मु. पो. खेडशी, ता. जि. रत्नागिरी ४१५६३९ या पत्त्यावर, किंवा kokanmedia@kokanmedia.in या ईमेलवर साहित्य पाठविता येईल.



