मुख्य बातमी

रत्नागिरीतील मुग्धनाद संगीत अकादमीच्या ‘नाट्यकुंतल’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

४१ विद्यार्थ्यांकडून साभिनय नाट्यसंगीत सादरीकरण

रत्नागिरी : येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात ‘नाट्यकुंतल’ हा साभिनय नाट्यसंगीताचा कार्यक्रम सादर झाला. प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायिका सौ. मुग्धा भट सामंत यांच्या संकल्पना व दिग्दर्शनातून , कै . गजानन भट यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा कार्यक्रम त्यांच्या ‘मुग्धनाद’ संगीत अकादमी मधील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम सादरीकरणाने प्रस्तुत केला. कार्यक्रमात सुरुवातीला सौ. मुग्धा सामंत यांच्या मातोश्री श्रीमती सुजाता भट व मामा रवींद्र साठे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व कै. गजानन भट यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात नमन नटवरा या नांदीने करण्यात आली. त्यानंतर एका पेक्षा एक सुरेख नाट्यगीते सादर केली गेली. यामध्ये नाथ हा माझा, एकला नयनाला, नाही मी बोलत, मी पुन्हा वनांतरी, सजणा का धरिला परदेस , खरा तो प्रेमा, मर्म बंधातली ठेव ही, मधुकर वनवन, नको नको घाई नको, लागी कलेजवा कटार, हे सुरांनो, वद जाऊ कुणाला, प्रीती सुरी दुधारी,उगवला चंद्र पुनवेचा , म्हातारा इतुका , मूर्तीमंत भीती उभी, पावना वामना, अंगणी पारिजात फुलला ही नाट्यपदे तसेचपंच तुंड नर रुंड माल धर ही संगीत शकुंतल मधील नांदी सादर केली. कार्यक्रमाचा शेवट सं.मूकानायक या नाटकातील हे प्रभो विभो या नांदीने करण्यात आला.

या कार्यक्रमात मुग्धनाद संगीत अकादमीच्या पुणे, मुंबई व रत्नागिरी येथील ४१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. संपूर्ण कार्यक्रमाला तबला साथ प्रथमेश शहाणे व ऑर्गन साथ श्रीरंग जोगळेकर यांनी अतिशय सुरेख केली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूर्वा खालगांवकर यांनी केले. या नाट्यपदांना लागणारे नेपथ्य प्रदीप तेंडुलकर व सहकारी यांनी सांभाळले. पांडुरंग बर्वे यांची ध्वनी व्यवस्था या संपूर्ण कार्यक्रमाला लाभली. कार्यक्रमासाठी अतिशय आकर्षक फुलांची रांगोळी प्रशांत जोशी यांनी काढली. यावेळी गुरुकृपा मंगल कार्यालयाचे नाना मराठे, भगवान दामले तसेच मंगेश मोरे, खल्वायन संस्थेचे अध्यक्ष मनोहर जोशी यांचे आभार मानण्यात आले.

सौ. मुग्धा भट सामंत यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेत कार्यक्रमाची संकल्पना स्पष्ट केली. तसेच मुलांच्या मेहेनतीचे कौतुक व पालकांनी दिलेल्या सहकार्याचे त्यांनी आभार मानले. या सारख्या कार्यक्रमातून रत्नागिरीमधे संगीत नाटकाला भावी गायिका अभिनेत्री लाभेल अशी आशा व्यक्त केली. प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात नाट्यकुंतल या साभिनय नाट्यगीत गायन कार्यक्रमाचे सादरीकरण पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!