मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

जिल्हा युवा साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे चिपळूण येथे उद्घाटन

१२ व १३ डिसेंबरला आयोजन; साहित्यप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन

चिपळूण : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाच्या अनुदानातून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात साहित्य संमेलनाचे आयोजन केले जाते. यावर्षी जिल्हा युवा साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान चिपळूणमधील नुकताच रौप्य महोत्सव साजरा केलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला मिळाला आहे. हे संमेलन १२ व १३ डिसेंबर रोजी चिपळूण येथे होणार आहे.

परशुराम एज्युकेशन संस्था, चिपळूण आणि कोकण मराठी साहित्य परिषद, चिपळूण शाखेच्या सहकार्याने तसेच चिपळूणमधील विविध वाचनालये, साहित्यिक संस्था, शाळा, शिक्षक आणि जिल्हाभरातील साहित्यप्रेमींच्या सहभागातून या संमेलनाचे आयोजन करण्यात येणार आहे.

संमेलनाच्या नियोजनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील तसेच जिल्ह्यातील व्यक्ती आणि संस्थांशी संपर्क साधण्यासाठी स्वतंत्र संपर्क कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव आणि परशुराम एज्युकेशन संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

चिपळूण नगर परिषदेच्या पुरस्कृत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाला जिल्हा युवा साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सांगितले. शासनाचे आभार मानत संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी नगर परिषद प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

हे साहित्य संमेलन चिपळूणच्या सांस्कृतिक वैभवाला साजेसे व्हावे, यासाठी चिपळूणसह परिसरातील आणि जिल्ह्यातील सर्व साहित्यप्रेमींनी योगदान द्यावे, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत यांनी केले.

यावेळी नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, वाचनालयाचे कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर, कोमसाप प्रतिनिधी मनिषा दामले, वाचनालय संचालक अमित ओक, प्रदीप पवार, मंजुषा चितळे, प्राची जोशी, ग्रंथपाल, कर्मचारी तसेच वाचक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!