मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नाणार-इंगळवाडी खाडीत बेपत्ता मायरा भाटकरचा शोध सुरू

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्याकडून कोस्टगार्डच्या कमांडो व हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधमोहीम

राजापूर : तालुक्यातील नाणार-इंगळवाडी येथील खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या भाटकर कुटुंबातील तिघांचे मृतदेह आढळले असून, त्यांच्यासोबत बुडालेली मायरा जुनेद भाटकर ही अद्याप बेपत्ता आहे. तिचा शोध घेण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व्यापक शोधमोहीम सुरू आहे.

या घटनेची नोंद सागरी पोलीस ठाणे, नाटे येथे अमृ रजिस्टर क्रमांक २७/२०२६, २८/२०२६ आणि २९/२०२६ अन्वये करण्यात आली आहे. खाडीच्या पाण्यात बुडून बुशरा जुनेद भाटकर, मोहम्मद जुनेद भाटकर आणि जुवेरिया जुनेद भाटकर यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यासोबत बुडालेल्या मायरा जुनेद भाटकरचा शोध अद्याप सुरू आहे.

रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोस्टगार्डच्या कमांडोंची मदत तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्याने शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी लांजा उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्यासह नाटे पोलीस ठाण्यातील १० पोलीस अंमलदार आणि सागरी सुरक्षा विभागाचे १० होमगार्ड तैनात आहेत.

याशिवाय रत्नागिरी पोलीस दलाच्या नौका विभागातील जवान, कायकिंग बोट तसेच मालवण येथील स्कुबा डायव्हिंग पथकाच्या माध्यमातून खाडीच्या पाण्यात शोधमोहीम राबविण्यात येत आहे. बेपत्ता मायराचा शोध घेण्यासाठी विविध यंत्रणांचे पथक युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!