मुख्य बातमी

माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचं, जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच : प्रशांत सातपुते

२७ ते २९ नोव्हेंबर मालगुंडमध्ये साहित्यकुंभ : ‘कोमसाप’च्या १८ व्या मध्यवर्ती साहित्य संमेलनाचा ‘ध्वज’ व ‘बोधचिन्हा'चे अनावरण

रत्नागिरी : “कोकणच्या मातीत शब्दांना निसर्गाचा गंध आणि समुद्राच्या लाटांची गाज असते. आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात माणसाला माणसाशी जोडून ठेवण्याचं आणि जगण्याचा खरा अर्थ शिकवण्याचे सामर्थ्य केवळ साहित्यातच आहे,” असे भावस्पर्शी प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.

मराठी साहित्याला ‘तुतारी’ फुंकून नव्या युगाची पहाट दाखवणाऱ्या आधुनिक मराठी काव्याचे जनक, कवी केशवसुतांच्या पावन जन्मभूमीत मालगुंड येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या १८ व्या मध्यवर्ती कोकण मराठी साहित्य संमेलनाचा ‘ध्वज’ आणि ‘बोधचिन्ह’ जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉ. प्रदीप ढवळ, १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन कार्यवाह गजानन पाटील, कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, शिक्षणाधिकारी माध्यमिक दीपक मेंगाणे, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, शिक्षण विस्तार अधिकारी महेश कांबळे, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश साळवी आदी उपस्थित होते.

श्री. सातपुते म्हणाले, “संमेलनाचा ध्वज आणि बोधचिन्ह म्हणजे केवळ कापडाचा तुकडा किंवा चित्राची रेषा नसते; तर ती असते साहित्य, संस्कृती, विचार आणि रसिकतेची एक उत्तुंग पताका! जेव्हा हा ध्वज आकाशात डोलू लागतो, तेव्हा तो केवळ एका सोहळ्याची घोषणा करत नाही, तर माणसाच्या अंतःकरणातील संवेदनशीलतेला साद घालत असतो. आजच्या या अनावरण सोहळ्याने येत्या संमेलनाचे मंगल तोरण बांधले गेले आहे.”

ते पुढे म्हणाले, “कोकण मराठी साहित्य परिषदेने कोकणचा सांस्कृतिक आणि भाषिक ठेवा अनेक वर्षे अविरतपणे जपला आहे. कवी केशवसुतांच्या स्मारकाच्या साक्षीने उभारला जाणारा हा साहित्यकुंभ निश्चितच नव्या विचारांची, संवादांची आणि साहित्यप्रेमींची एक नवी लाट निर्माण करेल.”

कोकण मराठी साहित्य परिषदेचे हे ऐतिहासिक १८ वे मध्यवर्ती मराठी साहित्य संमेलन २०२६ येत्या २७, २८ आणि २९ नोव्हेंबर रोजी मालगुंड येथे होणार आहे. कवी केशवसुत स्मारकाच्या परिसरात उभारल्या जाणाऱ्या या ज्ञानपीठात राज्यभरातून नामवंत साहित्यिक, कवी, समीक्षक आणि रसिक वाचक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

“आज फडकलेल्या या साहित्यध्वजाच्या छायेत आपण सर्वांनी एकत्र येऊ या आणि आगामी संमेलनाला शब्दांची, विचारांची आणि संस्कृतीची भव्य पालखी बनवू या,” असे आवाहन श्री. सातपुते यांनी केले.

साहित्य माणसाला जगण्याचा विचार देते आणि जगणे सुंदर करते. त्यामुळे साहित्य संमेलने ही केवळ शहरांपुरती मर्यादित न राहता ती ग्रामीण भागात तळागाळापर्यंत व नव्या पिढीतील तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजेत, असे विचार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर यांनी व्यक्त केले.

‘कोमसाप’ने गेल्या ३५ वर्षांच्या प्रवासात मॉरिशस आणि कॅनडासारख्या देशांमध्येही संमेलने घेऊन आपली ओळख वैश्विक स्तरावर निर्माण केली आहे. १९९१ मध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या वेळी ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कवी केशवसुतांच्या स्मारकाची उभारणी आणि ‘कोमसाप’च्या स्थापनेचा संकल्प याच भूमीतून सोडला होता, याची आठवण त्यांनी करून दिली. तरुणांच्या हातात लेखणी यावी आणि त्यांनी साहित्याच्या माध्यमातून आपली मते व्यक्त करावीत, हाच अशा संमेलनांचा मूळ हेतू असल्याचे कीर यांनी स्पष्ट केले. आगामी संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके असल्याने, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात साहित्य आणि विज्ञानाची उत्तम सांगड या संमेलनातून घातली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साहित्य संमेलन संस्मरणीय ठरेल : अभिजित हेगशेट्ये

मालगुंड येथील केशवसुत स्मारकात दिमाखात पार पडणारे साहित्य संमेलन अखिल भारतीय पातळीवरील संमेलनाच्या दर्जाचे व्हावे असा प्रयत्न असल्याचे अभिजित हेगशेट्ये यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालयांतील तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडण्यासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून विशेष ग्रंथदिंडीचे आयोजन केले जाणार आहे. संमेलनाला उपमुख्यमंत्री, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यवर तसेच महाराष्ट्रातील ज्येष्ठ साहित्यिक उपस्थित राहणार असल्याने हे संमेलन ऐतिहासिक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

साहित्यातून संस्कार आणि भाषेचे संवर्धन काळाची गरज: प्रा. डॉ. प्रदीप ढवळ

“वर्गखोल्या आणि अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन नवी पिढी घडवण्यासाठी साहित्य व वाचनाचे संस्कार रुजवणे अत्यंत आवश्यक आहे,” असे ठाम मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी व्यक्त केले. ३ ऑक्टोबर २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही अभिमानास्पद बाब ठरली असून, त्यानंतर भाषेचा जागर राज्यभरात अधिक वेगाने सुरू आहे. परिवहन विभाग व मराठी भाषा विभागाच्या सहकार्याने सुमारे १ लाख ६० हजारांहून अधिक अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना दैनंदिन वापरासाठी सुलभ मराठी शिकवण्याचा यशस्वी उपक्रम राबवण्यात आला, ज्याला मोठा प्रतिसाद मिळाला.

आगामी संमेलनाला ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ व विज्ञान लेखक डॉ. बाळ फोंडके यांच्यासह मॉरिशसच्या राजदूत शीला बापू (ज्या मूळच्या सावंतवाडीच्या कन्या आहेत) उपस्थित राहणार आहेत.

कार्यवाह गजानन पाटील यांनी सविस्तर प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन माधव अंकलगे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!