मुख्य बातमी

रत्नागिरीत उद्या ‘वरदाम : युवती संमेलना’चे आयोजन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व रत्नागिरी नगरपालिकेचा च्या संयुक्त उपक्रम

रत्नागिरी : युवतींमधील नेतृत्वगुणांना वाव मिळावा, त्यांच्या सामर्थ्याची जाणीव व्हावी आणि विविध क्षेत्रांत कार्य करण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, दक्षिण रत्नागिरी आणि रत्नागिरी नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वरदाम : युवती संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन उद्या (१९ ऑक्टोबर) सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे हे संमेलन होणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे यांनी दिली.

रत्नागिरी नगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रत्नागिरी शहर प्रमुख प्रा. दीप्ती पंडित, दक्षिण रत्नागिरी जिल्हा संयोजक श्रावणी प्रभू महाजन, युवती संमेलन प्रमुख स्नेहा भिडे यांच्यासह चारुदत्त भडसावळे, सिद्धेश्वर लाड, माही सावंत, दुहिता धोलकर आदी उपस्थित होते.

याविषयी माहिती देताना प्रा. सहस्रबुद्धे म्हणाले, “‘सामर्थ्याची जाणीव, नेतृत्वाची उंच भरारी’ हे या संमेलनाचे ब्रीदवाक्य आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेली देशव्यापी विद्यार्थी संघटना आहे. युवतींना प्रेरणादायी व्यक्तींची संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणे, त्यांच्या नेतृत्वगुणांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक जीवनातील सहभाग वाढविणे, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.”

संमेलनाच्या उद्घाटन सत्रात रत्नागिरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे, उपविभागीय पोलीस अधिकारी आरांक्षा यादव, र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्ष शिल्पा पटवर्धन आणि देवगड शिक्षण प्रसारक मंडळाच्या उपाध्यक्षा नेहा जोशी यांची उपस्थिती नियोजित आहे.

संमेलनातील परिसंवादात विद्यार्थी नेतृत्वाच्या क्षेत्रातून श्रावणी प्रभू महाजन, उद्योगक्षेत्राच्या क्षेत्रातून स्वरूपा सरदेसाई आणि सोशल मीडिया व कंटेंट क्रिएशनच्या क्षेत्रातून कस्तुरी शेख सहभागी होणार आहेत. त्यांच्या अनुभवातून युवतींना विविध क्षेत्रांतील संधी, आव्हाने आणि नेतृत्वाच्या वाटचालीविषयी मार्गदर्शन मिळणार आहे.

या संमेलनात मार्गदर्शनपर सत्रे, परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्वसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करणारे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात येणार आहे. या माध्यमातून युवतींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन आणि सामाजिक जाणीव वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील इयत्ता ११ ते १२ च्या युवतींसाठी हे संमेलन खुले असून, सुमारे ७०० युवतींच्या सहभागाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी विविध महाविद्यालयांशी संपर्क साधण्यात येत असून नोंदणी प्रक्रिया सुरू आहे.

युवतींनी मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होऊन विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन घ्यावे आणि या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!