कै. उज्वला वसंत भिडे स्मृती क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेस रत्नागिरीत प्रारंभ

रत्नागिरी : जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रत्नागिरी तालुकास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेची सुरुवात आज येथील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमी येथे झाली. या स्पर्धेची ही दुसरी आवृत्ती आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी विजय भिडे, जनता सहकारी बँक लांजा शाखेचे व्यवस्थापक उपेंद्र खेर, आंतरराष्ट्रीय पंच विवेक सोहनी, मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीचे संचालक चैतन्य भिडे आदी मान्यवर उपस्थित होते. विजय भिडे यांनी एक गुणवान बालबुद्धिबळपटू रूपक चाचले याच्या सोबत पटावर प्रतिकात्मक चाली रचून स्पर्धेचे उद्घाटन केले.

या स्पर्धेला चांगला प्रतिसाद लाभला आहे. अकरा क्लासिकल फिडे मानांकित खेळाडूंसह रत्नागिरी तालुक्यातून एकूण अडतीस बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. सर्वत्र बुद्धिबळाच्या जलद व अतिजलद स्पर्धाच अधिक प्रमाणात चालू आहेत. बुद्धिबळपटूंना क्लासिकल प्रकारात विचार करायला अधिक वेळ मिळतो व खेळ विकसित होण्यास मदत होते. तसेच डाव लिहून खेळलेला असल्याने नंतर डावाचे विश्लेषण करता येते. क्लासिकल बुद्धिबळाचे हे फायदे लक्षात घेऊन अश्या स्वरूपाच्या स्पर्धांचे आयोजन रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत सातत्याने करण्यात येत आहे.
स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीअखेर प्रथम मानांकित सौरीष कशेळकर, सोहम रुमडे, साहस नारकर, विहंग सावंत, ओम तेरसे, आयुष रायकर, अलिक गांगुली, श्रीहास नारकर आणि कौस्तुभ हर्डीकर यांनी सलग दोन विजयांची नोंद करत संयुक्तपणे आघाडी मिळवली आहे. जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या नियमां नुसार स्विस लीग पद्धतीने सहा फेऱ्यांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.



