महाराष्ट्रमुख्य बातमी

अभिनेता टायगर श्रॉफ जीवघेण्या हल्ल्यातून सुदैवाने बचावला; हल्लेखोरांनी अगदी जवळून झाडल्या होत्या गोळ्या

लॉरेन्स बिश्नोई गँगने स्विकारली हल्ल्याची जबाबदारी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी रात्री जुहू येथे लॉरेन्स बिश्नोई गँगच्या शुटर्सनी गोळीबार केला. एका दुचाकीवरून आलेल्या या हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर सात गोळ्या झाडल्या. मात्र, या हल्ल्यात टायगर श्रॉफ सुदैवाने वाचला. तर त्याच्या गाडीचा चालक फिरदौस आणि आणखी एक व्यक्ती गोळी लागल्याने जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी अगदी जवळून टायगर श्रॉफच्या दिशेने सात राऊंड फायर केले. मात्र, नशीब बलवत्तर असल्याने टायगर या हल्ल्यातून वाचला. एवढेच नव्हे तर नंतर टायगरने प्रसंगावधान दाखवत स्वत: गाडीच्या स्टेअरिंगचा ताबा घेत आपल्या जखमी चालकाला रुग्णालयापर्यंत नेले. यानंतर इतक्या मोठ्या हल्ल्यातून टायगर श्रॉफ कसा बचावला, याचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे. याची दोन कारणे समोर आली आहेत.

 

एका प्रत्यक्षदर्शी महिलेने या प्रसंगाबाबत सांगताना म्हटले की, टायगर श्रॉफ इथून गाडीने निघत होता तेव्हा सगळे चाहते जमले होते. ते टायगरला पाहण्यात मग्न होते. तिथून जवळच हल्लेखोर उभे होते. तेदेखील टायगरला पाहण्यासाठी आले असतील, असे सगळ्यांना वाटले. सुरुवातीला या हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या तेव्हा टायगर श्रॉफ आल्याच्या आनंदात काहीजण फटाके वाजवत असतील, असे सगळ्यांना वाटले. मात्र, काहीवेळाने हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचे लक्षात आले. हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या तेव्हा टायगर बेटा एकदम खाली झोपला. त्याचा ड्रायव्हर गाडी चालवत होता. आम्ही सगळे टायगरकडे पाहत होतो, असे या महिलेने सांगितले. या महिलेच्या सांगण्यावरुन टायगर श्रॉफ हा हल्लेखोरांनी गोळ्या झाडताना गाडीत खाली झोपून राहिल्याने वाचला, असे म्हणावे लागेल.

 

दुसरे कारण म्हणजे टायगर श्रॉफच्या गाडीवर दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या, एकजण बाईकवर बसून होता. टायगर श्रॉफ याची गाडी निघत असताना एका हल्लेखोराने गाडीच्या समोरुन गोळ्या झाडल्या. तर दुसरा हल्लेखोर टायगर श्रॉफ बसलेल्या बाजूच्या खिडकीच्या अगदी जवळ उभा होता. त्याने टायगर श्रॉफच्या दिशेने फायरिंगही केली. मात्र, त्याची गन ऐनवेळी लॉक झाल्याने तो हल्लेखोर गोळ्या झाडू शकला नाही. हा हल्लेखोर टायगर श्रॉफच्या बाजूला अगदी जवळ उभा होता. त्याने आणखी काही राऊंड फायर केले असते तर टायगर श्रॉफ जखमी होण्याची दाट शक्यता होती. मात्र, हल्लेखोराची गन लॉक झाल्याने पुढचा अनर्थ टळला, असे सांगितले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!