लांजातील महिलेच्या खून व जबरी चोरीच्या गुन्ह्याचा रत्नागिरी पोलीस दलाकडून अवघ्या १२ तासांत उलगडा

लांजा : पोलीस ठाणे हद्दीतील वेरवली रामगाव (लाडवाडी, ता. लांजा) येथे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे (वय ७५) यांच्या खून व सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने अवघ्या १२ तासांत छडा लावून आरोपीस अटक केली आहे. स्थानिक माहितीच्या आधारे, तांत्रिक विश्लेषण आणि तीन स्वतंत्र तपास पथकांनी केलेल्या समन्वित व वेगवान कारवाईमुळे या गुन्ह्याची तातडीने उकल करण्यात रत्नागिरी पोलीस दलाला यश आले आहे. याप्रकरणी प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यास ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनांक १९ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान वैशाली विलास हेगिष्टे ह्या आपल्या घरी एकट्या असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला. त्यानंतर त्यांच्या दोन्ही हातांतील सोन्याच्या दोन बांगड्या व दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेऊन, त्यांच्या हातात नकली बांगड्या घालण्यात आल्याचे तपासात समोर आले. या घटनेप्रकरणी लांजा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 271/2026, भारतीय न्याय संहिता कलम 103(1), 309 (4) व 332 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली. गुन्ह्याची लवकरात लवकर उकल करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन दिले. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या समन्वयाने तातडीने तीन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली.
या पथकांनी गुन्ह्याच्या तपासासाठी वेळेचे महत्त्व लक्षात घेऊन स्थानिक माहितीचे संकलन, संशयितांची पडताळणी आणि तांत्रिक विश्लेषण यावर भर दिला. विविध दिशांनी समांतर तपास करून उपलब्ध माहितीची पडताळणी करण्यात आली. पथकांमधील समन्वय आणि वेगवान तपासामुळे काही तासांतच महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. त्यानुसार घटनास्थळापासून सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) यास ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान कर्जबाजारीपणामुळे हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक, श्री. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे तसेच लांजा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नीलकंठ बगळे आणि राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह लांजा स.पो.नि. देवकन्या मैदाड, पोलीस उपनिरीक्षक अमोद सरंगले, पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव (लांजा), पोलीस अंमलदार नितेश राणे (लांजा), पोलीस अंमलदार प्रियांका कांबळे (लांजा), पोलीस अंमलदार प्रतीक्षा राणे (लांजा), श्रेणी पो.उनि. संजय मारळकर (लांजा), स्थानिक गुन्हे अन्वेषण रिलेशन शाखेचे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर (स्था.गु.अ.शा), गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईंटराम, चा. पो.हवा दत्ता कांबळे, पोलीस अंमलदार अतुल कांबळे यांच्या पथकाने केली.



