मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

कुटगिरी पुनर्वसन येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

सावर्डे : चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षण समिती, विभाग कुटरे गट क्रमांक ३ अंतर्गत गावशाखा कुटगिरी बौद्धजन सेवा संघ, नांदगाव पुनर्वसन यांच्या वतीने ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी समाजमंदिरात उत्साहात साजरा करण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष आयु. तुकाराम महादेव कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात संघटनेचे सदस्य, महिला मंडळ आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सकाळी तथागत भगवान बुद्ध यांची पूजा करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांना प्रसाद म्हणून खीरदान करण्यात आले.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या ऐतिहासिक घटनेने देशात सामाजिक समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांना नवी दिशा दिली. या ऐतिहासिक धम्मक्रांतीला २०२६ मध्ये ७० वर्षे पूर्ण झाली आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मविचारांचा प्रसार करणे, सामाजिक एकता जपणे आणि समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी प्रयत्न करणे, हा या दिनाचा महत्त्वपूर्ण संदेश आहे.

कुटगिरी पुनर्वसन येथील कार्यक्रम संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि महिला मंडळाच्या सहकार्याने यशस्वीरीत्या पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!