खरवते गावातील नेटवर्कची समस्या सुटणार
शिवसेना नेते विनायक राऊत आणि युवासेनेच्या पाठपुराव्याला यश : जिओकडून तातडीने टॉवर उभारण्याचे आश्वासन

रत्नागिरी : डिजिटल युगामध्येही गेल्या अनेक वर्षांपासून रत्नागिरी तालुक्यातील मौजे खरवते गावची युवा पिढी आणि ग्रामस्थ इंटरनेट व मोबाईल नेटवर्कच्या सुविधेपासून वंचित होते. गावातील अनेक वाड्यांमध्ये नेटवर्क नसल्यामुळे शालेय विद्यार्थी, तरुण आणि नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता. गावाची हीच तीव्र व्यथा खरवते येथील युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावंत युवासैनिक करण निवेंडकर यांनी मांडली. या कार्यात त्यांना माजी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत यांचे मोलाचे पाठबळ आणि मार्गदर्शन लाभले. प्रसाद सावंत व तालुकाप्रमुख संदेश नारगुडे यांच्या खंबीर पाठबळामुळेच करण निवेंडकर यांनी शिवसेना नेते, सचिव तथा माजी खासदार विनायक राऊत यांच्याकडे या समस्येचा यशस्वी पाठपुरावा केला.
युवा पिढीचे आणि ग्रामस्थांचे होणारे शैक्षणिक व व्यावसायिक नुकसान लक्षात घेऊन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यावर तातडीने पावले उचलली. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (जिओ) रत्नागिरीच्या जनरल मॅनेजर यांना अधिकृत पत्र लिहून मौजे खरवते येथे नवीन जिओ टॉवर तात्काळ मंजूर करण्याची आग्रही मागणी केली.
शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आज युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे आणि युवासैनिक करण निवेंडकर यांनी जिओच्या रत्नागिरी कार्यालयात जाऊन जनरल मॅनेजर यांना हे अधिकृत निवेदन प्रत्यक्ष सुपूर्द केले.
या निवेदनाची जिओ प्रशासनाने अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. जिओ कार्यालयाचे जनरल मॅनेजर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत, तत्काळ खरवते गावाला भेट देऊन पाहणी करण्याचे आणि गावात लवकरच नवीन जिओ टॉवर उभे करण्याचे ठोस आश्वासन दिले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर अखेर तोडगा निघणार असल्याने खरवते गावातील युवा पिढी आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. ग्रामस्थांनी शिवसेना नेते विनायक राऊत, माजी युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, युवासेना तालुकाप्रमुख संदेश नारगुडे आणि युवा सैनिक करण निवेंडकर यांचे विशेष आभार मानले आहेत.


