मुख्य बातमी

गणपतीपुळ्यात अवतरली ‘स्वरांची पौर्णिमा’

पं. सुहास व्यास यांच्या शिष्यांच्या सुरेल गायकीने रसिक मंत्रमुग्ध

रत्नागिरी : भारतीय शास्त्रीय संगीत हे मनाला आनंद देणारं आहे. अनेक ख्यातनाम गायकांनी या संगीताला साज दिला. त्यातीलच एक पंडीत सुहास व्यास. श्री. व्यास आणि त्यांच्या ९ शिष्यांनी बैठकीची शास्त्रीय संगीत मैफल रंगवून रसिकांना मनमुराद आनंद दिला. निमित्त होते कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित अवीट मैफलीचे. तालुक्यातील गणपतीपुळे-निवेंडी येथील डॉ. निमकर्स ‘कोकण नेस्ट’ हॉटेलमध्ये झालेल्या या कार्यक्रमात खऱ्या अर्थाने ‘स्वरांची पौर्णिमा’ अवतरली.

संपूर्ण शास्त्रीय रागदारीवर आधारलेली ही मैफल तब्बल ८ ते ९ तास रंगली. दीर्घ काळानंतर लाभलेल्या या अद्वितीय स्वरानुभूतीने दर्दी कानसेन रसिकांचे कान पूर्णपणे तृप्त झाले. पं. सी. आर. व्यास यांचे सुपुत्र पं. सुहास व्यास यांनी अहिर ललत राग ऐकवून स्वरांची जादू दाखवली. सर्व शिष्यांचा कार्यक्रम ऐकल्यानंतर पं. व्यास यांनी सुमारे अर्धा तास सादरीकरण केले. ७७ व्या वर्षीही त्यांची संगीताप्रती असलेले प्रेम, लगाव जाणवला. त्यांचे सुपुत्र आदित्य व्यास यांनी देखील राग रागेश्री व एक नवी बंदिश सादर करून वातावरण भारून टाकले.

पहिल्या सत्रात उत्साही वातावरणात आशुतोष वेलणकर यांनी ‘राग शुद्ध कल्याण’ अत्यंत समर्थपणे सादर केला, पाठोपाठ संत मीराबाईंचा म्हारा री या भजनाने वातावरणात भक्तीरस निर्माण केला. त्यानंतर पंडित सुहास व्यास यांनी आशुतोष यांच्या चार वर्षांच्या संगीत साधनेचे आणि वाढलेल्या आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले; तसेच यापुढील काळात दररोज गुरूसोबत रियाज करण्याचा मोलाचा सल्लाही दिला.

नीरज गोडसे यांनी ‘राग मारू बिहाग’ रंगवला व विष्णुमय जग अभंग ऐकवला. ज्ञानराज औसेकर यांनी मधुर स्वरांत ‘राग रागश्री’ ऐकवून श्रोत्यांची दाद मिळवली. त्यांच्या गायकीतील शुद्ध आणि स्पष्ट स्वरांच्या पकडीमुळे मैफलीतील रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. गुरु पं. व्यास यांनीही त्यांचे कौतुक करून औसेकर व व्यास कुटुंबियांचे सात पिढ्यांचे गायकीचे संबंध असल्याचे सांगितले. तर ऐश्वर्या परदेशी यांनी ‘राग जोग’ची मांडणी केली व भेटी लागी जीवा हा अभंग सादर केला.

कार्यक्रमाच्या उत्तररंगात म्हणजेच दुसऱ्या सत्रात सुरांचा हा प्रवाह अधिकच गतीमान आणि आल्हाददायक झाला. केदार केळकर यांनी ‘राग बिहागडा’चे सादरीकरण केले, तर शर्वरी वैद्य यांनी ‘राग जोगकंस’ अप्रतिमपणे रंगवून श्रोत्यांना संगीताच्या दुनियेत गुंगवून ठेवले. त्यानंतर अतिशय तयारीचे गायक आनंद बेंद्रे यांनी गांभीर्य आणि भव्यता असलेला ‘राग दरबारी कानडा’ सादर करत संपूर्ण मैफलीला एका वेगळ्याच अलौकिक उंचीवर नेऊन ठेवले. या संपूर्ण मैफलीमध्ये सर्वच गायकांनी आपापल्या रागांमधील विविध बंदिशी सादर करून शास्त्रीय संगीतातील विविध बारकावे श्रोत्यांसमोर मांडले. स्वानंद भुसार यांनी राग जनसंमोहिनी ऐकवला व वाटेवर काटे वेचित चाललो हे गीत सादर केले.

रत्नागिरीतील प्रसिद्ध गायक, गुरु प्रसाद गुळवणी यां संपूर्ण मालकंस सादर करून मैफलीत एक वेगळीच रंगत आणली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा वाढल्याचे पं. व्यास यांनी सांगितले की, पूर्वीचे गायक कोणीही बोलावले तरी जायचे, हा त्यांचा गुण होता. तसेच आम्ही सर्व जुने लहान-मोठे गायक कुठेही भेटलो की गायकांवर न बोलता गाण्यावर बोलत होतो. बैठकीच्या कार्यक्रमात कोणीही स्वतःचे गाणे झाले की जात नव्हते. दुसऱ्याचे ऐकूनच ते जात असत. आजच्या मैफलीत मी भैरवी सादर केली नाही, कारण असे कार्यक्रम शिष्यांना शिकण्यासाठी आवश्यक असतात. कोणाचेही गाणं ऐकावं, ते आवडलं नाही तरी ते ऐकून त्यातील शिकले पाहिजे. त्यामुळे अशा मैफली डॉ. निमकर्स कोकण नेस्ट येथे आयोजित कराव्यात. कार्यक्रमात गौरी वेलणकर व शिरीष वेलणकर यांनी पं. व्यास यांचा सन्मान केला.

या स्वरमयी सोहळ्यास संवादिनीची (हार्मोनियम) साथ अमित ओक आणि चैतन्य पटवर्धन यांनी केली, तर तबल्याची लयदार व समर्पक साथ सोहम जोशी आणि संतोष वैद्य यांनी देऊन मैफलीत प्राण फुंकले. शास्त्रीय संगीताच्या या भव्य आणि प्रदीर्घ आयोजनामुळे डॉ. निमकर्स ‘कोकण नेस्ट’चा परिसर सुरांच्या वर्षावात न्हाऊन निघाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!