महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे खेडमध्ये उत्साहात उद्घाटन

खेड : नगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘सावित्रीबाई शहर वस्तीस्तर महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री महोत्सवाचा उद्घाटन सोहळा शिवतेज आरोग्य संस्था तीनबत्ती नाका खेड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महिला बचत गटांमधील महिलांनी स्वतःच्या मेहनतीतून, कौशल्यातून आणि कल्पकतेतून तयार केलेल्या विविध वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आला होता. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध आकर्षक व उपयुक्त वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्याला खेडच्या नगराध्यक्षा माधवी राजेश बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे, नगरसेवक गटनेते तथा भाजपा अल्पसंख्याक सेल रत्नागिरी जिल्हाध्यक्ष रहीम सहिबोले, विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर, नगरसेविका स्वप्नाली चव्हाण, भाजपा खेड शहराध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, गटनेते तथा नगरसेवक निकेतन पाटणे, नगरसेवक तौसीफ खोत, नगरसेविका दीप्ती शिगवण, नगरसेविका अंजुम कुरणे, नगरसेविका आरती पवार, नगरसेवक स्वप्निल सैतवडेकर, नगरसेविका संजना कुडाळकर, नगरसेवक आरिफ मुल्लाजी, नगरसेविका रेश्मा खतीब, नगरसेविका वर्षा सापटे, नगरसेविका रसिका खेडेकर, नगरसेवक मिनार चिखले, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांच्या उपक्रमाचे कौतुक करत महिलांनी आपल्या कौशल्याच्या बळावर उद्योग-व्यवसायात पुढे यावे, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे आणि स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करावी, अशा शुभेच्छा दिल्या.
महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारा आणि त्यांच्या आर्थिक प्रगतीला चालना देणारा हा उपक्रम खेड शहरातील महिला बचत गटांसाठी निश्चितच प्रेरणादायी होता.



